मनमानी भाडे आकारणाऱ्या ट्रव्हल कंपन्यांना दणका, 9158 वाहनांवर कारवाई; साडेचार कोटींचा दंड वसूल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सणासुदीच्या आणि गर्दीच्या काळात अवाचे सवा भाडे आकारून प्रवाशांची लूट करणाऱ्या खासगी ट्रव्हल कंपन्यांना परिवहन विभागाने दणका दिला आहे. 1 एप्रिल 2025 ते 31 मे 2026 या कालावधीत राबविलेल्या विशेष मोहिमेत 51 हजार 104 वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी जादा भाडे आकारणाऱ्या 9158 वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून 4 कोटी 61 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

राज्यातील काही ट्रव्हल कंपन्या प्रवाशांकडून दुप्पट ते तिप्पट भाडे आकारून प्रवाशांची लूट केली जाते. ट्रव्हल बसच्या भाडे दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून काय कार्यवाही केली जाते, याबाबत श्रीकांत भारतीय यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर राज्यातील खासगी प्रवासी वाहनांचे कमाल भाडेदर 27 एप्रिल 2018 च्या शासन निर्णयाद्वारे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार एसटी महामंडळाच्या संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति किमी भाडेदराच्या 50 टक्के पेक्षा अधिक भाडे खासगी बस वाहतूकदारांना आकारता येत नाही. निर्धारित भाडेदरापेक्षा जादा भाडे आकारल्याचे निदर्शनास आल्यास अशा वाहतूकदारांविरुद्ध मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येते, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी लेखी उत्तरात दिली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी ट्रव्हल बसेसविरुद्ध सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालयातील वायुवेग पथकाद्वारे कारवाई केली जाते, असेही त्यांनी सांगितले.

बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या 11 हजार वाहनांवर कारवाई

अपुऱ्या कागदपत्रांसह नियमबाह्य प्रवासी वाहतूक, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणे, सुरक्षाविषयक नियमांकडे दुर्लक्ष करणे अशा अवैध प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एसटी महामंडळ आणि परिवहन विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे विशेष मोहीम राबवली जात आहे. याअंतर्गत एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत एकूण 95 हजार वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या 11 हजार 140 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 4 कोटी 32 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला अशी माहिती परिवहनमंत्र्यांनी दिली. अवैध प्रवासी वाहतुकीवरील कारवाईसंदर्भात सचिन अहिर यांनी तारांकित प्रश्न विचारला होता.

Comments are closed.