शिवसेना मदतीला धावली
अनेक दिवसांपासून हुलकावणी देत असलेल्या पावसाने मंगळवारी मुंबईत दमदार हजेरी लावत चांगलेच झोडपून काढले. या मुसळधार पावसामुळे शहरात सर्वत्र दाणादाण उडाली. ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. तर अनेक भागातील रहिवाशांच्या घरात पाणी घुसल्याने त्यांची चांगलीच गैरसोय झाली. ही बाब लक्षात येताच शिवसैनिक रस्त्यावर उतरले व नागरिकांच्या मदतीसाठी धावले.
परळमधील जगन्नाथ भातणकर मार्ग येथे परळ प्रभादेवी पुलाचे काम सुरू आहे. तेथील कॉण्ट्रक्टरने पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी वाहिनी तोडल्यामुळे संपूर्ण परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले होते. रहिवाशांनी संपर्क साधताच शिवसेना आमदार अजय चौधरी व नगरसेविका भारती पेडणेकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतील. त्यांनी एमएमआरडीए व महापालिकेच्या अधिकाऱयांसोबत परिसराची पाहणी केली. तसेच तोडलेली वाहिनी त्वरित दुरुस्त करून घेतली. यावेळी प्रथमेश जगताप, शाखाप्रमुख मिनार नाटळकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे दैनिक सामना प्रेस मार्गावरील नागू सयाजी वाडी येथे पाणी साचले होते. ही बाब लक्षात येताच स्थानिक नगरसेवक निशीकांत शिंदे सकाळी आठ वाजल्यापासून रस्त्यावर उतरले होते. त्यांनी तत्काळ पाहणी करत परिसराचा आढावा घेतला. त्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱयांकडून योग्य उपाययोजना करत पाण्याचा निचरा करून घेतला. यावेळी शाखाप्रमुख शैलेश माळी, समन्वयक चंदन साळुंखे आणि शिवसैनिक उपस्थित होते.
Comments are closed.