संजय पाटील यांना UAPA खाली अटक व्हायला हवी! संजय राऊत यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासोबत गद्दारी करून मिंधे गटात गेलेले खासदार संजय दीना पाटील यांनी त्यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसंच आंदोलनकर्त्यांवर बॉम्ब टाकेन, त्यांना स्मशानात पाठवेन अशा धमक्याही दिल्या होत्या. या प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहले आहे. या पत्रातून त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत संजय पाटील यांना अटक व्हायला हवी अशी मागणी केली आहे. तसेच भविष्यात शिवसेनेच्या एकाही राजकीय कार्यकर्त्यावर हल्ला किंवा त्याचा खून झाला तर त्याला संजय पाटील जबाबदार असतील असे या पत्रात म्हटले आहे.
श्री@DevenBhartiIPSजी
विषय गंभीर आहे! pic.twitter.com/4C3KgQeB6W— संजय राऊत (@rautsanjay61) 25 जून 2026
संजय राऊत यांनी लिहलेले पत्र –
”एका गंभीर बाबीकडे मी आपले लक्ष वेधत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब) पक्षातून फुटलेले सहा खासदार देशभरात घृणेचा विषय ठरले आहेत. या फुटीविरुद्ध महाराष्ट्राच्या जनतेत कमालीचा संताप असून मतदारांची घोर फसवणूक झाल्यामुळे लोक ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. आंदोलन करणे, लोकप्रतिनिधीस जाब विचारणे हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार आहे. पण ईशान्य मुंबईतील ‘फुटीर’ खासदार संजय पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. संजय पाटील म्हणतात. ‘माझ्या नादाला लागू नका. माझ्याविरोधात आंदोलन करण्याआधी जिवाचा विमा काढून घ्या. मी सरळ तुम्हाला स्मशानात पाठवीन, नाहीतर हॉस्पिटलात पाठवीन. मी याआधी 5 लोकांना ठार केले आहे. (ठार केलेले हे 5 लोक कोण व संजय पाटील यांनी त्यांना कधी व का ठार केले त्याचा तपास व्हावा. आरोपीने स्वतःच कबुली दिल्याने त्यांच्याविरोधात तत्काळ हत्येचा गुन्हा दाखल व्हावा.) माझ्याविरोधात कोणी आंदोलन केले तर त्यांच्यावर बॉम्ब टाकेन. घरात घुसून मारेन’, असे संजय पाटील म्हणाले आहेत. भारतीजी, खासदाराकडून बॉम्ब टाकण्याची धमकी चिंताजनक आहे. हे बॉम्ब त्यांनी आपल्या घरात बनवले असतील तर त्यांच्या घराची त्वरित झडती घ्यावी. त्याकामी दहशतवादविरोधी पथकाची मदत घ्यावी. हे बॉम्ब त्यांना कुणा दहशतवादी टोळीकडून मिळाले असतील तर हा राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर मुद्दा मानावा लागेल व दहशतवादी, राष्ट्रविरोधी कृत्यांत सहभागी झाल्याबद्दल त्यांना लगेच UAPA खाली अटक होणे गरजेचे आहे. त्यांची सर्व वक्तव्ये दहशतवाद, गुन्हेगारी कृत्यात सहभागी होण्याचे पुरावे आहेत. त्यांच्या विरोधात त्वरित कारवाई व्हावी, अन्यथा मला जनतेच्या सुरक्षेसाठी न्यायालयात दाद मागावी लागेल. खा. पाटील यांच्या धमकीमुळे समाजात चिंतेचे वातावरण आहे. या काळात एखाद्या राजकीय कार्यकर्त्यांवर हल्ला झाला अथवा खून झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी संजय पाटील यांच्यावर राहील, हे मी इथे खास नमूद करतो” असे संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.
Comments are closed.