नेपाळमध्ये जलविद्युत प्रकल्पातील 93 कामगार बेपत्ता; थर्मल ड्रोनने बोगदा पिंजून काढला, हाती काहीच खाणाखुणा नाहीत
नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे मोठी जीवितहानी झाली असून, विविध जलविद्युत प्रकल्पांमध्ये काम करणारे शेकडो कामगार बेपत्ता झाले आहेत. रसुवा जिल्ह्यामधील रसुवागढी जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात किमान 93 कामगार अडकले असण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यांचा शोध घेण्यासाठी नेपाळी लष्कर, अभियंते आणि ड्रोन पथकाने विशेष बचावमोहीम राबवली. मात्र, बोगद्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचून थर्मल ड्रोनच्या मदतीने शोध घेतल्यानंतरही आत कोणी असल्याच्या खाणाखुणा मात्र मिळाल्या नाहीत.
‘भोटे कोसी’ नदीला आलेल्या भीषण पुरामुळे जलविद्युत प्रकल्प परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. त्यामुळे बोगद्यात काम करणारे कामगार पुरापासून बचाव करण्यासाठी बोगद्याच्या दुसऱ्या टोकाला गेले असावेत, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. या शक्यतेच्या आधारे बचाव पथकाने बोगद्यात प्रवेश करून तपासणी सुरू केली.
लष्कराच्या नेतृत्वाखालील पथकाने बोगद्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. त्यानंतर आत जाणे धोकादायक किंवा कठीण असलेल्या भागांची पाहणी करण्यासाठी थर्मल ड्रोनचा वापर करण्यात आला. ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण परिसर तपासण्यात आला. मात्र, कोणताही कामगार जिवंत असल्याचे संकेत किंवा हालचाली आढळल्या नाहीत. असे वृत्त एनडीटीव्ही ने दिले आहे.
ड्रोन पथकाला बोगद्यात कोणीही नसल्याचे आढळल्यानंतर ही शोधमोहीम थांबवण्यात आली. त्यानंतर बचाव पथक रसुवा जिल्ह्यातील धुंचे येथे परतले. नेपाळच्या नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट ऑथॉरिटीने (NDRRMA)सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, देशातील जलविद्युत प्रकल्पांशी संबंधित तब्बल 93 जण बेपत्ता आहेत. पुराच्या काळात अनेक जलविद्युत प्रकल्पांमध्ये शेकडो कामगार भूमिगत बोगद्यांमध्ये कार्यरत होते. त्यामुळे हे कामगार बोगद्यांमध्ये अडकले आहेत की सुरक्षित ठिकाणी गेले आहेत किंवा पुराच्या प्रवाहात वाहून गेले आहेत, याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही. नेपाळमध्ये पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक भागांमध्ये बचाव आणि मदतकार्य अद्याप सुरू आहे. बेपत्ता कामगारांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी बचाव पथकांकडून प्रयत्न सुरू आहेत.
Comments are closed.