IPL मधील धडाकेबाज कामगिरी अन् 35 वर्षांच्या अष्टपैलू खेळाडूची टीम इंडियामध्ये वर्णी लागणार!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

IPL मध्ये धडाकेबाज कामगिरी करूनही मागील 5 वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर असलेला कृणाल पंड्या अचानक चर्चेत आला आहे. कृणाल पंड्याची अष्टपैलू खेळी IPL मध्ये अनेकवेळा संघासाठी वर्दान ठरली आहे. त्यामुळेच त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कारण अशाच अष्टपैलू खेळाडूच्या शोधात सध्या टीम इंडिया आहे. याला कारण ठरलीये टी20 फॉरमॅटमध्ये अक्षर पटेलची फलंदाजीतली खराब कामगिरी. त्यामुळे 35 वर्षांच्या कृणाल पंड्याची टीम इंडियामध्ये एन्ट्र्री होण्याची शक्यता बळावली आहे.

अक्षर पटेलच्या चालू वर्षातील टी20 मधील खेळाचा विचार करता त्याने 12 डावांमध्ये फक्त 69 धावा केल्या आहेत. तर जून 2024 नंतर त्याला एकदाही 30 हून अधिक धावा करता आल्या नाही. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कृणाल पंड्या टी-20 संघात पुनरागमन करून डावखुरा फिरकी गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूची भूमिका यशस्वीपणे पार पाडू शकतो. जुलै 2021 मध्ये श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाकडून शेवटचा सामना खेळलेल्या कृणालने आतापर्यंत 19 टी-20 सामन्यांत 15 विकेट्स आणि 124 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल 2026 मध्ये त्याने चमकदार कामगिरी करताना 226 धावा आणि 14 विकेट्स घेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला चॅम्पियन बनवण्यात मोलाचे योगदान दिले आहे.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाची पुढील टी-20 मालिका 13 ते 17 सप्टेंबर दरम्यान अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. जर कृणाल पंड्या संघात परतला, तर आगामी 2028 चा टी-20 विश्वचषक आणि त्याच वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी तो हिंदुस्थानच्या डाव्या हाताच्या फिरकी अष्टपैलू खेळाडूच्या जागेसाठी पहिली पसंती ठरू शकतो. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत टीम इंडियाला वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि श्रीलंका संघाविरुद्धही टी-20 मालिका खेळायच्या आहेत.

Comments are closed.