महेंद्र सिंग धोनी आणि चेन्नईच्या करारावर सीईओंकडून स्पष्टीकरण! नेमकं सत्य काय?

आयपीएल 2026 (IPL 2026) संपल्यापासून चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघात काही मोठे बदल होताना दिसत आहेत. फ्रँचायझीने दिग्गज मुख्य प्रशिक्षक (Head Coach Stefan Fleming) स्टीफन फ्लेमिंग यांना त्यांच्या पदावरून हटवले आहे. तत्पूर्वी, महेंद्रसिंह धोनीला (Mahendra Singh Dhoni) फ्रँचायझीमध्ये पुन्हा एकदा मोठी भूमिका मिळण्याबाबत चर्चा सुरू होती.
यादरम्यान एका बातमीने खळबळ उडवून दिली, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला की, महेंद्रसिंह धोनीने चेन्नई फ्रँचायझीकडे 25 टक्के भागीदारी (Shares) मागितले आहेत. आता या वादावर चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ काशी विश्वनाथन (Kashi Vishwanathon) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
रिपोर्टनुसार, महेंद्र सिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्सकडे फ्रँचायझीची 25 टक्के हिस्सेदारी मागितली होती. नंतर धोनीने ती 20 टक्के केली. मात्र, फ्रँचायझीने त्याला केवळ 5.5 टक्केच ऑफर केली आहे. या रिपोर्टनंतर सोशल मीडियावर महेंद्र सिंग धोनी आणि चेन्नईमधील संबंध बिघडल्याची चर्चा सुरू झाली. इतकेच नाही तर धोनी हा संघ सोडणार असल्याच्याही चर्चांना उधाण आलं होतं.
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी ‘पीटीआय’शी बोलताना या वादावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी या चर्चेला साफ चुकीचे आणि बिनबुडाचे म्हटले आहे. धोनीने कधीही फ्रँचायझीकडे हिस्सेदारी मागितलेली नाही, असे स्पष्ट करत त्यांनी या चर्चेत काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.
याआधी भारताचे माजी खेळाडू आकाश चोपडा (Akash Chopda) यांनीही ही बातमी खोटी ठरवली होती. त्यांच्या मते, एखाद्या खेळाडूला हजारो कोटी रुपये देणे ही चर्चा खरी असू शकत नाही. याशिवाय, सीईओ काशी विश्वनाथन यांना धोनीच्या भविष्याबद्दल विचारले गेले, तेव्हा ते म्हणाले की, माहीने अद्याप खेळण्यापासून नकार दिलेला नाही. त्यामुळे 45 व्या वर्षीही धोनी आयपीएल 2027 मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसू शकेल, अशी चाहत्यांना अजूनही अपेक्षा आहे.
एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या किमान एका सामन्यात तरी धोनी मैदानात दिसेल, अशी चाहत्यांना आशा आहे. अलीकडच्या काळात अशीही चर्चा आहे की, CSK फ्रँचायझी आता धोनीला मार्गदर्शकाच्या (mentor) भूमिका पाहू इच्छित आहे. ज्याप्रमाणे आयपीएल 2024 मध्ये गौतम गंभीरने कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाची धुरा सांभाळली होती, अगदी त्याच भूमिकेत CSK ला आता धोनीला पाहयचे आहे. जिथे धोनी कर्णधार ऋतुराज गायकवाडसोबत मिळून पुढील काही वर्षे संघाचे नेतृत्व करेल.
Comments are closed.