Ice Gola : थंडगार बर्फाचा गोळा भर उन्हात खाताय?




बर्फाचा गोळा


मागील काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण राज्यभरात तीव्र उन्हाच्या चटक्यांचा सामना करावा लागत आहे. अशा उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी अनेकांची पावले रस्त्याच्या कडेला दिसणार्‍या रसवंती गृहे, बर्फाच्या गोळ्याच्या हातगाड्यांकडे वळताना दिसतायेत. बर्फाचा गोळा दिसताच आवडीचा फ्लेवर सांगून मनसोक्त त्या बर्फाच्या गोळ्याचा आनंद घेण्यात येतो किंवा रसवंती दुकानदाराला रसाची ऑर्डर दिली जाते. परंतू असे करताना तुम्ही नकळत आजारांना निमंत्रण देता, कारण तुम्ही ज्या बिना बर्फाच्या रसाची किंवा बर्फाच्या गोळ्याची ऑर्डर देता त्यात वापरण्यात येणार बर्फ निकृष्ट दर्जाचा असण्याची शक्यता दाट असते.

उन्हाळ्यात कामानिमित्त बाहेर असताना थंडगार ताक, ज्यूस, लस्सी प्यायली जाते. पण रस्त्यांवरील अशी शीतपेये पिताना सावधान राहायला हवे. कारण यात वापरण्यात येणारा
बर्फ दूषित असू शकतो. या बर्फात ई-कोलाय नावाचा बॅक्टेरिया असण्याची दाट शक्यता असते. बर्फ बनवताना योग्य ती काळजी न घेतल्यास, चुकीच्या पद्धतीने बर्फाची साठवणूक केल्यास आणि बर्फ बराच वेळ रस्त्यावरच तसाच ठेवल्यास त्यात ई-कोलायसारखे जिवाणू शिरकाव करतात. हे बॅक्टेरिया रस किंवा बर्फामार्फत शरीरात गेल्यावर अनेक आजारांना आमंत्रण मिळते.

ई-कोलाय हा मानव आणि प्राण्याच्या शरीरात आढळणारा बॅक्टेरिया आहे. ई-कोलायचे अनेक प्रकार आहेत, त्यातील काही बरेचसे निरुपद्रवी, काही उपयोगी आणि काही घातक असतात. यापैंकी केरोटॉक्सिन हा एक अविषारी असा ई-कोलाय बॅक्टेरिया पाण्यात आढळतो.  हा बॅक्टेरिया गाई-गुरे, म्हशी अशा पाळीव प्राण्यांमध्येही आढळून येतो. परंतू,मानवामध्ये केरोटॉक्सिन हा घटक अतिशय संसर्गजन्य असून यामुळे वेगवेगळे आजार होऊ शकतात. केरोटॉक्सिन आपल्या शरीरातील पेशींमध्ये तयार होणार्‍या प्रोटीनला रोखून धरतो. प्रोटीन तयार होणे बंद झाले तर शरीरातील पेशी मरू लागतात व पेशींची संख्या कमी होते, त्यामुळेच वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागू शकते.

अनेकदा स्टोरेजसाठी असणारा कच्चा बर्फ हा शीतपेयांसाठी स्वस्तात विक्री केला जातो. अशा बर्फामुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात. तसेच गोळा विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या हातात अनेकदा ग्लोज नसतात त्यामुळे अस्वच्छ हातानेच ते गोळा बनवतात आणि आपण तो खातो. असा अस्वच्छ गोळ्याचे पदार्थ खाल्ल्यास पोटाचे आजार होऊ शकतात. म्हणूनच हा बर्फाच गोळा कुठे बनवला जातोय, आजूबाजूचा परिसर कसा आहे, कोणत्या दर्जाचे घटक त्यात वापरले जातात याची माहिती घेऊनच खावा किंवा घरात विविध फळांची आईस्क्रिम, ज्यूस बनवावा.

हेही वाचा – उष्माघाताची लक्षणे आणि घरगुती उपचार



Comments are closed.