Motion Sickness: प्रवासात मळमळतंय? औषधांशिवाय करा ‘हे’ सोपे नैसर्गिक उपाय!




मोशन सिकनेस


आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. अनेकजण गावी जाण्याची तयारी करत आहेत, तर काही जण फिरायला जाण्याचे प्लॅन करत आहेत. या दिवसांत प्रवासाचे प्रमाण वाढते, पण त्याचबरोबर उकाडाही खूप वाढलेला असतो. अशा वेळी गाडीने किंवा बसने प्रवास करताना अनेकांना मळमळ, चक्कर येणे किंवा उलटी होण्याचा त्रास जाणवतो. त्यामुळे प्रवासाचा आनंद कमी होतो. ही समस्या ‘मोशन सिकनेस’ म्हणून ओळखली जाते. शरीर आणि मेंदू यांच्यातील समन्वय बिघडल्यामुळे हा त्रास होतो. काही जण यावर औषध घेतात, पण वारंवार औषध घेणे योग्य नाही. त्यामुळे काही सोपे आणि नैसर्गिक उपाय करून तुम्ही हा त्रास कमी करू शकता. (try these simple natural remedies without medication for motion sickness)

आले खा
प्रवासात मळमळ होत असेल तर आले खूप उपयोगी ठरते. त्यामध्ये मळमळ कमी करणारे गुण असतात. तुम्ही प्रवासाआधी किंवा प्रवासादरम्यान आल्याचा छोटा तुकडा चावू शकता किंवा आल्याचा चहा पिऊ शकता.

लिंबू जवळ ठेवा
लिंबाचा सुगंध आणि त्याचा आंबटपणा मळमळ कमी करण्यात मदत करतो. प्रवासात लिंबू सोबत ठेवा. मळमळ वाटल्यास त्याचा वास घ्या किंवा थोडासा रस चाखा.

पुदिना वापरा
पुदिना पोटाला शांत ठेवतो आणि गॅस किंवा उलटीचा त्रास कमी करतो. तुम्ही पुदिन्याची पाने चावू शकता किंवा पुदिन्याचे पाणी पिऊ शकता.

लवंग चावा
लवंगामध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात आणि ती मळमळ कमी करते. प्रवासात 1-2 लवंगा चावल्याने उलटीचा त्रास कमी होतो आणि तोंडाची चवही सुधारते.

वेलची खा
वेलची पचन सुधारते आणि ताजेतवाने वाटायला मदत करते. प्रवासादरम्यान 1-2 वेलची खाल्ल्यास मळमळ कमी होते.

हे छोटे-छोटे उपाय करून तुम्ही प्रवास अधिक सुखद आणि आरामदायी बनवू शकता. त्यामुळे या सुट्ट्यांमध्ये कोणताही त्रास न होता मनमोकळेपणाने प्रवासाचा आनंद घ्या.



Comments are closed.