Poha And Health : दररोज पोहे खाणे आरोग्यासाठी चांगलं की वाईट?

महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाचा सकाळचा नाश्ता म्हणजे पोहे. चवीबरोबर आरोग्यासाठी फायदेशीर असणारे पोहे आवडीने खाल्ले जातात. आयर्न आणि कार्बोहायड्रेट्सचा उत्तम स्रोत असलेले पोहे हा एक पारंपारिक आणि पौष्टिक नाश्ता मानला जातो. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, दररोज पोहे खाणे तुमच्या आरोग्यासाठी नक्की फायदेशीर आहे की नुकसानकारक? जाणून घेऊयात पोहे खाल्ल्यानंतर शरीरावर काय परिणाम होतो?

पोहे खाण्याचे फायदे –

पोहे प्रोबायोटिक असल्याने आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगले मानले जातात.

शरीराला उर्जा देण्यासाठी आवश्यक असलेले कार्बोहायड्रेट्स पोह्यात असतात.

सकाळी नाश्त्यात पोहे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

हेही वाचा – Summer Drinks: उन्हाळ्यात रोज लिंबू पाणी पिण्याचे शरीराला होतात ‘हे’ जबरदस्त फायदे

पोह्यामध्ये कमी कॅलरीज असतात आणि त्यातील फायबरमुळे पोट बराच वेळ भरलेले राहते, ज्यामुळे अति खाणे टाळले जाते.

पोह्यामध्ये फॅट कमी असते आणि मॅग्नेशियम असते, जे हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

कांदा, शेंगदाणे आणि कढीपत्ता घालून बनवलेले पोहे प्रथिने, व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्त्रोत आहेत.

पण आरोग्यतज्ज्ञांच्या मते पोहे पचायला हलके असले तरी मधुमेह असलेल्या रुग्णांनी ते मर्यादित प्रमाणात खावेत. तसेच पोहे जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोट जड होते. त्यामुळे काही गोष्टी पोहे खाताना लक्षात ठेवाव्यात.

पोहे खाताना काय काळजी घ्यावी?

पोहे अधिक पौष्टिक करण्यासाठी त्यात शेंगदाणे, मटार, गाजर, कांदा आणि कढीपत्ता यासारख्या भाज्या वापराव्यात. यामुळे प्रोटिनही मिळतील.

जर तुम्ही वेटलॉस करत असाल तर पोहे बनवताना तेलाचा वापर कमी करावा.

काहींना पोहे खाताना वरून साखर मिक्स करण्याची सवय असते, जी दररोज खाणे आरोग्यासाठी योग्य नाही. त्यामुळे हे टाळावे.

थोडक्यात सांगायचे झाल्यास तर तुम्ही जर भरपूर भाज्या घालून आणि कमी तेलात बनवलेले पोहे खात असाल, तर ते रोज खाणे नक्कीच आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र, पोटाचा त्रास असणारे, मधुमेह रूग्णांनी दररोज पोहे खाणे टाळावे. पोह्यासोबत नाश्तात उपमा, मूग डाळ धिरडे, घावणे यांचाही समावेश करावा.

हेही वाचा – Sugarcane Juice: उसाच्या रसाच्या एका ग्लासमध्ये असते ‘इतके’ चमचे साखर

Comments are closed.