Fire Safety Gadgets: उन्हाळ्यात घराला द्या फायर सेफ्टी कवच
उन्हाळा सुरू झाला की तापमानासोबतच घरात आग लागण्याच्या घटनांमध्येही मोठी वाढ होताना दिसते. एसीचा स्फोट, फ्रीजमधील शॉर्ट सर्किट, ओव्हरलोडेड वायरिंग, गॅस गळती किंवा किचनमधील निष्काळजीपणा अशा छोट्या चुका काही सेकंदांत मोठ्या दुर्घटनेत बदलू शकतात. (summer fire safety gadgets)
अनेकदा आग लागल्यानंतर लोक घाबरून जातात, कारण घरात तात्काळ वापरता येईल अशी कोणतीही फायर सेफ्टी साधनं उपलब्ध नसतात. पण योग्य वेळी योग्य खबरदारी घेतली तर मोठं नुकसान टाळणं शक्य आहे. तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक घरात काही बेसिक फायर सेफ्टी गॅझेट्स असणं अत्यंत गरजेचं आहे. ही साधनं केवळ आग विझवण्यासाठीच नाहीत, तर वेळेत इशारा देऊन जीवितहानी टाळण्यासही मदत करतात.
1. अग्निशामक यंत्र
घरात सर्वात महत्त्वाचं सेफ्टी टूल म्हणजे फायर एक्स्टिंग्विशर. अचानक लागलेली छोटी आग सुरुवातीलाच नियंत्रणात आणण्यासाठी हे अत्यंत उपयोगी ठरतं. विशेषतः इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वायरिंग किंवा किचनमधील आग विझवण्यासाठी हे प्रभावी मानलं जातं तर घरात एबीसी फायर एक्स्टिंग्विशर ठेवणं अधिक फायदेशीर ठरतं.
2. किचनसाठी फायर ब्लँकेट
किचनमध्ये तेल, गॅस किंवा पॅनमधून अचानक आग लागल्यास फायर ब्लँकेट खूप उपयोगी ठरते. ही ब्लँकेट आगीवर झाकल्याने ऑक्सिजनचा पुरवठा बंद होतो आणि आग पटकन विझते. विशेषतः तेलाच्या आगीवर पाणी टाकण्यापेक्षा हा पर्याय अधिक सुरक्षित मानला जातो. याचा फायदा म्हणजे हे वापरण्यास अधिक सोपं आणि गॅस किंवा तेलाच्या आगीवर प्रभावी आहे.
3. स्मोक अलार्म
घरात आग लागण्याआधी धूर निर्माण होतो आणि तो ओळखण्याचं काम स्मोक अलार्म करतो. धूर वाढताच अलार्म मोठा आवाज करतो, त्यामुळे वेळीच सावध होऊन मोठी दुर्घटना टाळता येते. हे स्मोक अलार्म किचनजवळ, हॉलमध्ये किंवा बेडरूमच्या बाहेर बसवणं फायदेशीर आहे.
4. वायरिंग आणि प्लगची नियमित तपासणी
उन्हाळ्यात एसी, कूलर, फ्रीज यांचा वापर वाढतो. त्यामुळे वायरिंगवर ताण येऊन शॉर्ट सर्किटचा धोका वाढतो. यामुळे एकाच सॉकेटमध्ये अनेक उपकरणं जोडू नका. जळालेला प्लग किंवा वायर लगेच बदला. सैल वायरिंगकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांच्या मते, घरातील जुनी वायरिंग ही आगीचं मोठं कारण ठरू शकते.
5. गॅस सेफ्टीकडे दुर्लक्ष करू नका
किचनमधील छोटासा निष्काळजीपणा मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकतो. म्हणून, गॅस वापरानंतर रेग्युलेटर बंद करा. गॅसचा वास आल्यास लगेच खिडक्या उघडा. त्या वेळी इलेक्ट्रिक स्विच ऑन करू नका. या सगळ्याबरोबर गॅस पाइप नियमित तपासा.
घर सुरक्षित ठेवण्यासाठी या सवयीही महत्त्वाच्या
– इलेक्ट्रॉनिक उपकरणं अनावश्यक चालू ठेवू नका.
– घर सोडताना मेन स्विच तपासा.
– मुलांना मॅचबॉक्स आणि लायटरपासून दूर ठेवा.
– इमर्जन्सी नंबर घरात लिहून ठेवा.
– फायर सेफ्टी ड्रिलची माहिती कुटुंबाला द्या.
Comments are closed.