First Pregnancy : पहिलं बाळंतपण माहेरीच का होतं?
घरात पहिल्यांदाच पाळणा हलणार असतो, तेव्हा आनंदासोबत काळजीही तितकीच असते. लेकीच्या डोहाळजेवणानंतर तिच्या माहेरी जाण्याची तयारी सुरू होते आणि अनेक घरांत एक वाक्य हमखास ऐकायला मिळतं पहिलं बाळंतपण माहेरीच व्हायला हवं. ही फक्त जुनी परंपरा आहे का, की त्यामागे एका नव्या आईच्या मनाचा आणि शरीराचा विचार दडलेला आहे, हा प्रश्न अधिक महत्वाचा ठरतो.
पूर्वीच्या काळात वैद्यकीय सुविधा मर्यादित होत्या. गरोदर स्त्रीची काळजी घेण्यासाठी अनुभवी स्त्रिया आणि घरचं सुरक्षित वातावरण हाच मोठा आधार मानला जायचा. त्यामुळे मुलीला प्रसूतीसाठी माहेरी आणण्याची पद्धत तयार झाली. पण काळ बदलला तरी ही भावना आजही अनेक घरांत कायम आहे.
आईचा आधार सर्वात महत्त्वाचा
पहिल्यांदा आई होणाऱ्या स्त्रीसाठी गर्भधारणा आणि बाळंतपण हा पूर्णपणे नवीन अनुभव असतो. शरीरात होणारे बदल, प्रसूतीची भीती, बाळाची काळजी घेण्याची चिंता अशा अनेक भावना तिच्या मनात सुरू असतात. अशावेळी स्वतःच्या आईजवळ राहिलं की ती अधिक मोकळी होते. आईला मुलीच्या सवयी, तिचं दुखणं, तिचे मूड स्विंग्ज आणि तिच्या गरजा शब्दांशिवाय समजतात. त्यामुळे तिचा मानसिक ताण कमी होतो.
सासर कितीही प्रेमळ असलं तरी तिथे सून म्हणून काही जबाबदाऱ्या असतातच. अनेक महिलांना स्वतःची तब्येत सांभाळण्यापेक्षा घरातील कामांची चिंता जास्त वाटते. पण माहेरी आल्यावर ती पुन्हा एकदा त्या घरची लाडकी मुलगी बनते. उशिरा उठणं, हट्ट करणं, आराम करणं किंवा फक्त शांत बसणं यासाठी तिला कोणताही संकोच वाटत नाही. हीच मानसिक मोकळीक गरोदर स्त्रीसाठी खूप महत्त्वाची ठरते.
बाळ आणि आईची योग्य काळजी
बाळ जन्मल्यानंतरचे सुरुवातीचे दिवस तर आणखी नाजूक असतात. बाळाला कसं धरायचं, दूध कसं पाजायचं, आईचा आहार कसा असावा, झोपेचं वेळापत्रक कसं सांभाळायचं अशा अनेक गोष्टी नव्या आईसाठी अवघड असतात. अशावेळी अनुभवी आईचा हात तिच्यासाठी मोठा आधार ठरतो. याच काळात अनेक महिलांना पोस्टपार्टम डिप्रेशनचा त्रासही होऊ शकतो. अचानक रडू येणं, एकटेपणा वाटणं, भीती वाटणं अशा भावना सामान्य असल्या तरी त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. माहेरी हक्काची माणसं, बालपणीच्या आठवणी आणि भावनिक आधार मिळाल्याने महिलांना या अवस्थेतून बाहेर पडणं तुलनेने सोपं जातं.
Comments are closed.