Workout Tips : वर्कआउट इंटरेस्टिंग बनवण्याचे सोपे उपाय

सध्याच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये फिट राहण्यासाठी अनेकजण नियमित व्यायाम, योगा किंवा जिमचा आधार घेतात. सुरुवातीला उत्साहाने सुरू झालेला फिटनेसचा प्रवास काही काळानंतर मात्र कंटाळवाणा वाटू लागतो. रोज तीच तीच एक्सरसाइज, तेच रूटीन आणि त्यातून मिळणारे मर्यादित परिणाम यामुळे अनेकजण व्यायाम अर्धवट सोडून देतात. मात्र फिटनेस तज्ज्ञांच्या मते, व्यायामात थोडासा बदल आणि नवीन गोष्टींचा समावेश केल्यास वर्कआउट पुन्हा एकदा आनंददायी बनू शकते.

वर्कआउटचा कंटाळा का येतो?
कोणतीही गोष्ट सतत एकाच पद्धतीने केली तर त्यातील नावीन्य कमी होते. व्यायामाच्या बाबतीतही हेच घडते. शरीर एका ठराविक रूटीनशी जुळवून घेतल्यामुळे प्रगतीचा वेग कमी होतो. फिटनेसच्या भाषेत याला प्लेटो स्टेज असे म्हटले जाते. या टप्प्यावर शरीराला आणि मनालाही बदलाची गरज असते. त्यामुळे व्यायामाच्या पद्धतीत थोडेफार बदल करणे आवश्यक ठरते.

शक्ती चालणे
ट्रेडमिलवर धावण्यापेक्षा एखाद्या बागेत किंवा हिरव्यागार परिसरात पॉवर वॉक करणे अधिक फायदेशीर ठरू शकते. निसर्गाच्या सान्निध्यात चालल्याने शरीरासोबत मनालाही सकारात्मक ऊर्जा मिळते. आवडती गाणी ऐकत चालल्यास वॉक अधिक आनंददायी होतो आणि तणावही कमी होतो.

खेळांमधून फिटनेस
फिटनेस म्हणजे केवळ जिममधील व्यायाम नाही. सायकलिंग, हायकिंग, फुटबॉल, हॉकी, किक बॉक्सिंग किंवा इतर मैदानी खेळांमधूनही उत्तम व्यायाम होतो. मित्रांसोबत विकेंडला असे खेळ खेळल्यास शरीर सक्रिय राहते आणि फिटनेससोबत मनोरंजनही होते.

डान्स फिटनेस
नव्या पिढीत झुंबा, एरोबिक्स आणि डान्स कार्डिओ यांची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. संगीताच्या तालावर केले जाणारे हे व्यायाम प्रकार शरीरातील जवळपास प्रत्येक स्नायू सक्रिय करतात. त्यामुळे कॅलरी बर्न होण्यास मदत होते आणि व्यायामाचा कंटाळाही येत नाही.

हुला हुपिंग
हुला हूपिंग हा कार्डिओ व्यायामाचा एक वेगळा आणि मजेदार प्रकार आहे. कमरेभोवती रिंग फिरवत हा व्यायाम केला जातो. यामुळे शरीराची हालचाल वाढते, कंबर सुदृढ राहते आणि अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत मिळते. आठवड्यातून एकदा हा व्यायाम केल्यास फिटनेस रूटीनमध्ये नवीन उत्साह निर्माण होऊ शकतो.

फिटनेस प्लॅन
आठवड्यातील प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारच्या अॅक्टिव्हिटींचा समावेश करावा. दोन दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग, दोन दिवस योगासन, एक दिवस कार्डिओ आणि डान्स, एक दिवस मेडिटेशन आणि एक दिवस मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या अॅक्टिव्हिटी केल्यास शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहतात.

Comments are closed.