Bath Time: अंघोळ करण्याची ‘ही’ आहे योग्य वेळ




अंघोळ करण्याची योग्य वेळ


आंघोळ हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अनेकांच्या दिवसाची सुरुवात सकाळच्या फ्रेश अंघोळीने होते, तर काही जण दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी रात्री अंघोळ करणं पसंत करतात. विशेषतः उन्हाळ्यात उकाड्यामुळे अनेकजण दिवसातून दोन वेळा अंघोळ करतात. मात्र, आरोग्यासाठी नेमकी कोणती वेळ अधिक योग्य आहे, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो.

विज्ञानाच्या मते सकाळी आणि रात्री दोन्ही वेळा अंघोळ करण्याचे वेगवेगळे फायदे आहेत. कोणती वेळ सर्वोत्तम आहे याबाबत कोणताही ठोस निष्कर्ष नसला तरी दोन्ही वेळेच्या अंघोळीचा शरीर आणि मनावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. त्यामुळे अंघोळीची वेळ ही व्यक्तीच्या जीवनशैली, कामाचे स्वरूप आणि सवयींवर अवलंबून असते.

सकाळची अंघोळ का ठरते फायदेशीर?
सकाळी अंघोळ केल्याने शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने होतात. कोमट किंवा थंड पाण्याने अंघोळ केल्याने आळस दूर होतो आणि शरीराला नवचैतन्य मिळते. रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते आणि दिवसाची सुरुवात अधिक उत्साहाने करता येते. ऑफिस, व्यवसाय किंवा घरातील कामांसाठीही शरीर अधिक सक्रिय राहते.

रात्रीची अंघोळ का महत्त्वाची?
दिवसभर बाहेर फिरताना शरीरावर धूळ, घाम, प्रदूषण आणि बॅक्टेरिया जमा होतात. अशा परिस्थितीत अंघोळ न करता झोपल्यास ही घाण थेट बेडवर पोहोचू शकते. त्यामुळे स्वच्छतेच्या दृष्टीने रात्रीची अंघोळ उपयुक्त मानली जाते. यामुळे शरीर स्वच्छ राहते आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत मिळते.

कोमट पाण्याची अंघोळ
रात्री कोमट पाण्याने अंघोळ केल्यास शरीराला आराम मिळतो. अंघोळीनंतर शरीराचे तापमान हळूहळू कमी होत असल्याने मेंदूला विश्रांतीचे संकेत मिळतात. त्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते आणि झोप लवकर लागण्याची शक्यता वाढते. त्यामुळे तुमच्या दिनचर्येनुसार योग्य वेळ निवडा किंवा गरज वाटल्यास दोन्ही वेळा अंघोळ करण्याचाही पर्याय स्वीकारू शकता.



Comments are closed.