गर्दीत मूल हरवलं तर काय करायचं? पालकांनी आजच द्यावं हे प्रशिक्षण

मॉल, जत्रा, मंदिर, बाजारपेठ किंवा पर्यटनस्थळ अशा गर्दीच्या ठिकाणी मुलांचा हात क्षणभर सुटला तरी पालकांची धडधड वाढते. अनेकदा मुलंही घाबरून जातात आणि काय करायचं हे न समजल्याने परिस्थिती अधिक कठीण बनते. अशा वेळी घाबरण्याऐवजी मुलांना आधीपासून काही गोष्टी शिकवून ठेवणे त्यांच्यासाठी संरक्षण कवच ठरू शकते.

संकटाच्या क्षणी मुलांना आठवतील का हे धडे
लहान मुलांना केवळ अभ्यासच नव्हे तर सुरक्षिततेचे धडे देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. गर्दीत हरवल्यास काय करायचे, कोणाकडे मदत मागायची आणि स्वतःला सुरक्षित कसे ठेवायचे याचा सराव मुलांना घरीच करून दिल्यास ते अशा प्रसंगी अधिक आत्मविश्वासाने वागू शकतात. तज्ज्ञांच्या मते, योग्य प्रशिक्षण दिलेली मुलं घाबरण्याऐवजी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करतं.

मुलांना या गोष्टी नक्की शिकवा
– गर्दीत हरवल्यास एका जागी थांबून राहा.
– आई किंवा वडिलांचे पूर्ण नाव मोठ्याने सांगा.
– स्वतःचे नाव स्पष्टपणे सांगण्याचा सराव करा.
– जवळ पोलीस दिसल्यास त्यांच्याकडे मदत मागा.
– कुटुंबासोबत असलेल्या महिलेकडे किंवा सुरक्षा रक्षकाकडे जा.
– अनोळखी व्यक्तीसोबत कुठेही जाऊ नका.
– रडत फिरण्यापेक्षा मदत मागणे अधिक महत्त्वाचे आहे हे समजावून सांगा.

प्रत्येक मुलाला पाठ असावी ही माहिती
– आई किंवा वडिलांचा मोबाईल नंबर.
– घराचा पूर्ण पत्ता.
– जवळच्या परिसरातील महत्त्वाचा लँडमार्क.
– शाळेचे नाव.
– आपत्कालीन परिस्थितीत संपर्क करता येणाऱ्या नातेवाईकाचा नंबर.

पालकांनीही घ्यावी काळजी
– गर्दीच्या ठिकाणी मुलांचे अलीकडचे फोटो मोबाईलमध्ये ठेवा.
– लहान मुलांच्या खिशात संपर्क क्रमांक असलेले कार्ड ठेवा.
– ठराविक ठिकाणी भेटण्याचा नियम आधीच ठरवा.
– मुलांच्या कपड्यांचे रंग लक्षात ठेवा.
– गर्दीच्या ठिकाणी मोबाईलमध्ये गुंतून राहणे टाळा.

मुलांना घाबरवू नका, तयार करा
अनेक पालक मुलांना भीती दाखवून सावध करण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यामुळे मुलं अधिक घाबरू शकतात. त्याऐवजी त्यांच्याशी खेळाच्या स्वरूपात संवाद साधा, छोट्या छोट्या प्रसंगांचा सराव करून घ्या आणि कोणत्याही परिस्थितीत आई बाबा त्यांना शोधायला येतील हा विश्वास द्या.

Comments are closed.