लाकूड, प्लास्टिक की स्टील, कोणता चॉपिंग बोर्ड सर्वात सुरक्षित

स्वयंपाकघरातील एक साधी दिसणारी वस्तू तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकते, हे तुम्हाला माहीत आहे का? भाज्या आणि फळे चिरण्यासाठी वापरला जाणारा चॉपिंग बोर्ड केवळ सोयीसाठी नसून स्वच्छता आणि सुरक्षिततेशीही थेट जोडलेला असतो. लाकूड, प्लास्टिक आणि स्टील या पर्यायांमध्ये नेमका कोणता बोर्ड निवडावा, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. चुकीची निवड केल्यास अन्नात जंतू किंवा सूक्ष्म कण मिसळण्याचा धोका वाढू शकतो.

हल्ली बाजारात आकर्षक डिझाइनचे अनेक चॉपिंग बोर्ड उपलब्ध आहेत. मात्र केवळ किंमत किंवा दिसणे पाहून निर्णय घेणे योग्य नाही. टिकाऊपणा, स्वच्छता आणि आरोग्याचा विचार करूनच योग्य बोर्ड निवडणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या मते काही प्रकारचे बोर्ड आरोग्यासाठी अधिक सुरक्षित मानले जातात.

चॉपिंग बोर्ड निवडताना ‘या’ गोष्टी महत्वाच्या
भाज्या किंवा फळे चिरताना चॉपिंग बोर्डवर सतत चाकूचे वार होतात. त्यामुळे त्यावर ओरखडे पडणे, अन्नकण अडकणे आणि जंतू वाढणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. लाकडी बोर्ड वापरण्यास सोयीचे असले तरी ओलावा टिकून राहिल्यास त्यावर जंतू वाढण्याचा धोका असतो. प्लास्टिक बोर्ड स्वस्त असतात, मात्र कालांतराने त्यावर पडलेल्या खाचांमधून सूक्ष्म प्लास्टिकचे कण अन्नात जाण्याची शक्यता वाढते.

स्टीलचे चॉपिंग बोर्ड मात्र स्वच्छतेच्या बाबतीत अधिक विश्वासार्ह मानले जातात. त्यावर जंतू टिकून राहण्याची शक्यता कमी असते आणि ते वारंवार धुतले तरी खराब होत नाहीत. ग्रॅनाइट किंवा मार्बलचे बोर्ड मजबूत असले तरी त्यांचा वापर तुलनेने कमी सोयीचा ठरतो. त्यामुळे दीर्घकाळ टिकणारा, स्वच्छ आणि आरोग्यदायी पर्याय शोधत असाल तर स्टीलचा चॉपिंग बोर्ड अधिक सुरक्षित मानला जातो.

Comments are closed.