Kitchen Tips : वर्किंग महिलांसाठी मील प्रेपचा स्मार्ट फॉर्म्युला

हल्ली धावपळीच्या आयुष्यात ऑफिसच्या जबाबदाऱ्या आणि घरातील स्वयंपाक या दोन्ही गोष्टी सांभाळताना अनेक महिलांची अक्षरशः दमछाक होते. सकाळी नाश्ता, डबा, मुलांची तयारी आणि स्वतःची ऑफिसची घाई… या सगळ्यात स्वतःसाठी वेळच उरत नाही. अशा वेळी रोजच्या स्वयंपाकाची धांदल कमी करून आठवडा अधिक नियोजनबद्ध आणि तणावरहित बनवायचा असेल, तर ‘मील प्रेप’ हा स्मार्ट पर्याय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो.

मील प्रेप म्हणजे नेमकं काय?
मील प्रेप म्हणजे संपूर्ण आठवड्याचं जेवण बनवून ठेवणं नव्हे, तर स्वयंपाकासाठी लागणारी पूर्वतयारी करून ठेवणं. भाजी चिरणे, मसाले तयार ठेवणे, कडधान्ये उकडून ठेवणे किंवा पीठ मळून ठेवणे अशा छोट्या गोष्टी आधीच केल्यास रोजचा स्वयंपाक कमी वेळात आणि कमी कष्टात पूर्ण होतो.

विकेंडला करा तयारी
शनिवार किंवा रविवारी थोडा वेळ काढून गाजर, फ्लॉवर, बीन्स, मटार, हिरवी मिरची यांसारख्या भाज्या स्वच्छ करून चिरून एअरटाइट डब्यात ठेवता येतात. आले आणि लसूण सोलून तयार ठेवल्यास सकाळच्या स्वयंपाकातील बराच वेळ वाचतो. ही छोटी तयारी रोजच्या धावपळीत मोठा फरक घडवते.

तयार मसाला
कांदा, टोमॅटो, आले आणि लसूण यांचा बेस मसाला एकदाच तयार करून फ्रिजमध्ये ठेवल्यास दररोज मसाला परतण्याची गरज राहत नाही. सकाळी फक्त भाजी, पनीर किंवा कडधान्य घालून काही मिनिटांत चविष्ट डिश तयार होते. त्यामुळे ऑफिससाठी डबा बनवणं अधिक सोपं होतं.

कडधान्ये / बॅटर
राजमा, छोले, काळे चणे यांसारख्या पदार्थांना शिजायला जास्त वेळ लागतो. विकेंडला हे उकडून फ्रीजमध्ये ठेवले तर गरजेनुसार लगेच वापरता येतात. इडली, डोसा किंवा उत्तप्प्यासाठी लागणारं पीठही आधी तयार करून ठेवल्यास सकाळचा नाश्ता काही मिनिटांत तयार होतो.

पीठ आणि घरगुती मसाले
दररोज पीठ मळण्याऐवजी दोन ते तीन दिवसांसाठी पीठ तयार करून फ्रिजमध्ये ठेवता येते. तसेच जिरे, धणे, बडीशेप यांसारखे मसाले भाजून वाटून ठेवल्यास रायता, भाजी किंवा इतर पदार्थ झटपट तयार करता येतात.

मील प्रेपचे फायदे
मील प्रेपमुळे रोजचा स्वयंपाक कमी वेळात होतो, अनावश्यक ताण कमी होतो आणि बाहेरचं किंवा जंक फूड मागवण्याची गरजही कमी होते. यामुळे वेळेची बचत तर होतेच, पण घरचं ताजं आणि पौष्टिक अन्न खाण्याची सवयही कायम राहते. ऑफिस आणि घर या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या महिलांसाठी ही सवय फायदेशीर ठरू शकते.

Comments are closed.