पावसाळ्यात या चटपटीत पदार्थांमुळे होऊ शकते फूड पॉइझनिंग
बाहेर मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, हातात वाफाळलेला चहा आणि त्यासोबत खाण्यासाठी चटपटीत, मसालेदार पदार्थ. जसे की, कांदा भजी, बटाटा वडा, पाणीपूरी.. पाऊस सुरू झाल्यावर हे पदार्थ खाण्याचा मोह आवरत नाही. मात्र या दिवसात वातावरणात आर्द्रता वाढल्याने विविध प्रकारचे बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ झपाट्याने होते. त्यामुळे बाहेरील उघड्यावरील पदार्थ, दुषित पाणी किंवा अस्वच्छ पद्धतीने बनवलेले पदार्थ खाल्ल्यास फूड पॉइझनिंगचा धोका वाढतो. त्यामुळे मान्सूनमध्ये बाहेरचे अन्न खाताना विशेष काळजी घेणे आवश्यक असते.
पुढील पदार्थांमुळे होऊ शकते फूड पॉइझनिंग –
पाणीपुरी –
अनेकवेळा पाणीपुरीचे पाणी खूप आधीच बनवून ठेवलेले असू शकते. याशिवाय त्यासाठी वापरलेले पाणी स्वच्छ नसेल तर फूड पॉईझनिंग होऊ शकते.
तळलेले पदार्थ –
भजी, बटाटे वडे, समोसा यांसारखे तळलेले पदार्थ दुकानात बऱ्याचवेळा पुन्हा पुन्हा वापरलेल्या तेलात तळले जातात. अशा तेलातील पदार्थ खाल्ल्याने अपचन, गॅस, उलट्यांचा त्रास होऊ शकतो.
चाट –
भेळ, शेवपूरी, पाणीपूरी असे पदार्थ खाणेही पावसाळ्यात महागात पडू शकते, कारण पावसाळ्यात त्यामध्ये जीवाणूंची वाढ वेगाने होऊ शकते.
कापलेली फळे –
रस्त्याच्या कडेला विकली जाणारी फळे माश्या, डासांच्या संपर्कात येतात. ज्यामुळे संसर्ग होऊ शकतो.
स्वतःची अशी घ्या काळजी
पावसाळ्यात शक्यतो ताजे, गरम आणि स्वच्छ अन्न खावे.
उकळलेले किंवा शुद्ध पाणी पिण्याला प्राधान्य द्यावे.
बाहेरचे अन्न खायचे असल्यास स्वच्छता, अन्नाची गुणवत्ता आणि ते ताजे आहे का याची खात्री करावी.
योग्य आहार आणि स्वच्छतेच्या सवयी अंगीकारल्यास पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपलं महानगर लाईव्ह आणि ओन्ली मानिनी याची पुष्टी करत नाही.
हेही वाचा – पावसाळ्यात मका खाण्याचे फायदे काय? एका क्लिकवर जाणून घ्या माहिती
Comments are closed.