Single Mother : सिंगल मदरसाठी स्मार्ट फायनान्शियल टिप्स
सिंगल मदर असणं म्हणजे फक्त मुलाचं संगोपन नव्हे, तर संपूर्ण घराची आर्थिक जबाबदारी एकटीने सांभाळणंही असतं. घरभाडं, शाळेची फी, दैनंदिन खर्च, आरोग्याची काळजी आणि मुलाच्या भविष्यासाठी बचत अशा अनेक जबाबदाऱ्या एकाच वेळी पेलाव्या लागतात. त्यामुळे योग्य आर्थिक नियोजन करणे हे महत्वाचे आहे. काही सोप्या आर्थिक सवयी लावल्या, तर आर्थिक ताण कमी होण्यास आणि भविष्य अधिक सुरक्षित करण्यास मदत होऊ शकते. financial planning tips for single mothers
1) 50-30-20 बजेट नियम
महिन्याच्या उत्पन्नाचे तीन भाग करा. 50% घरभाडे, किराणा, शाळेची फी, वीजबिल यांसारख्या आवश्यक खर्चासाठी. 30% प्रवास, मनोरंजन किंवा इतर वैयक्तिक गरजांसाठी. तर 20% बचत आणि गुंतवणुकीसाठी राखून ठेवा. यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि नियमित बचत करणे सोपे जाते.
2) इमर्जन्सी फंड
नोकरी जाणे, अचानक आजारपण किंवा इतर अनपेक्षित खर्च कधीही समोर येऊ शकतात. अशा परिस्थितीसाठी किमान सहा महिन्यांच्या खर्चाइतकी रक्कम वेगळ्या बचत खात्यात किंवा लिक्विड फंडमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. हा निधी फक्त अत्यावश्यक परिस्थितीतच वापरा.
3) मुलांचे शिक्षण
उच्च शिक्षणाचा खर्च वर्षागणिक वाढत आहे. त्यामुळे मुलाच्या भविष्यासाठी शक्य तितक्या लवकर गुंतवणूक सुरू करणे फायदेशीर ठरते. मुलगी असल्यास सुकन्या समृद्धी योजना हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी एसआयपी (SIP) द्वारे म्युच्युअल फंडात नियमित गुंतवणूक करण्याचाही विचार करू शकता.
4) हेल्थ आणि टर्म इन्शुरन्स
कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती असल्याने स्वतःचे आणि मुलाचे आर्थिक संरक्षण महत्त्वाचे आहे. चांगला हेल्थ इन्शुरन्स मोठ्या वैद्यकीय खर्चापासून संरक्षण देऊ शकतो. टर्म लाइफ इन्शुरन्समुळे अनपेक्षित परिस्थितीत मुलाच्या आर्थिक भविष्यास आधार मिळू शकतो.
५) अनावश्यक खर्च
सेल, ऑफर्स किंवा क्रेडिट कार्डच्या आकर्षणामुळे गरज नसलेल्या वस्तूंवर खर्च होऊ शकतो. प्रत्येक खरेदीपूर्वी ती खरोखर आवश्यक आहे का, याचा विचार करा. तसेच आपल्या बचत, गुंतवणूक किंवा मालमत्तेसाठी योग्य नॉमिनी नोंदवा. आवश्यक असल्यास स्पष्ट मृत्युपत्र (Will) तयार करून ठेवा, जेणेकरून भविष्यात मुलाला कोणत्याही कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागू नये.
सिंगल मदर म्हणून जबाबदाऱ्या निश्चितच मोठ्या असतात, पण योग्य आर्थिक नियोजनामुळे त्या अधिक आत्मविश्वासाने पेलता येतात. नियमित बचत, योग्य गुंतवणूक, विमा संरक्षण आणि खर्चावर नियंत्रण या सवयी लावल्यास मुलाचे भविष्य अधिक सुरक्षित करण्यास मदत होईल.
Comments are closed.