छगन भुजबळांना शपथविधीपूर्वी फक्त एका ओळीचा मेसेज मिळाला, नेमकं काय घडलं?
छगन भुजबल महाराष्ट्र कॅबिनेट: महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण कोळून प्यायलेल्या मोजक्या नेत्यांपैकी एक अशी ओळख असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे पुन्हा एकदा अनपेक्षितपणे प्रकाशझोतात आले आहेत. महायुती सरकारच्या स्थापनेवेळी राज्य मंत्रिमंडळात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यावेळी छगन भुजबळ प्रचंड नाराज झाले होते. तेव्हापासून छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेतृत्त्वापासून आणि पक्षीय घडामोडींपासून काहीसे अंतर आणि अबोला राखून होते.
दरम्यानच्या काळात राज्य आणि देशपातळीवरील अनेक घडामोडींमुळे छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाचा विषयही राजकीय वर्तुळाच्या विस्मरणात गेला होता. खुद्द छगन भुजबळ यांनीच मंत्रिपद न मिळाल्याबाबत अधुनमधून नाराजी व्यक्त करण्यापलीकडे ठोस काहीतरी घडेल, ही आशा सोडून दिली होती. मात्र, सोमवारी रात्री महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनपेक्षित घडामोडी घडल्या आणि छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार, हे निश्चित झाले. छगन भुजबळ हे मंगळवारी सकाळी 10 वाजता राजभवनात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत मंत्रिपदाची शपथ घेतील, असे सांगितले जात आहे. छगन भुजबळ यांना मंत्रिपद स्वीकारल्यानंतर धनंजय मुंडे यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कारभार सोपवला जाईल, अशी दाट शक्यता आहे. (Maharashtra State Cabinet)
छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाची माहिती समोर आल्यानंतर पडद्यामागे नेमक्या काय घडले, याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्त्वाकडून किंवा छगन भुजबळ यांच्याकडून शेवटच्या क्षणापर्यंत मंत्रिपदाविषयी कोणतेही संकेत देण्यात आले नव्हते. खुद्द छगन भुजबळ यांनी आपल्याला केवळ एका ओळीचा संदेश मिळाल्याचे सांगितले. मला एवढंच सांगण्यात आलं की, राज्य मंत्रिमंडळात माझी वर्णी लागत आहे. मंत्रिपदाचा शपथविधी मंगळवारी सकाळी दहा वाजता होईल, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली. आता थोड्याचेळात महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे राजभवनातील सोहळ्यात छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची शपथ देतील.
छगन भुजबळ हे सध्या 77 वर्षांचे आहेत. ते महाराष्ट्राच्या गेल्या चार-पाच दशकांच्या राजकारणातील घडामोडींचे साक्षीदार आणि भागीदार राहिले आहेत. त्यामुळे डिसेंबर महिन्यात महायुती सरकारचा शपथविधी संपन्न झाला तेव्हा छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यानंतर छगन भुजबळ यांनी बेधडकपणे राष्ट्रावादी काँग्रेसचे नेतृत्त्व करणाऱ्या अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना सुनावायला मागेपुढे पाहिले नव्हते. राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वानेही छगन भुजबळ इतकी थेटपणे टीका करत असताना सबुरी आणि नरमाईचे धोरण अवलंबिले होते. या सगळ्यामागे ओबीसी मतपेढीचे गणित असल्याची चर्चा आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्याला दूर ठेवल्याने मोठा राजकीय फटका बसू शकतो. त्यामुळेच अजित पवार आणि महायुती सरकारची सूत्रे हलवणाऱ्या नेत्यांनी योग्यवेळी छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्याची चर्चा आता रंगली आहे.
https://www.youtube.com/watch?v=bsoa_3ovymc
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.