भाजपमध्ये प्रवेश करताच सुधाकर बडगुजरांकडून नाराजांना सूचक इशारा, म्हणाले…
सुधाकर बॅडगुझर: शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्यानंतर सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी मंगळवारी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करत असताना स्थानिक पातळीवर मात्र त्यांच्या प्रवेशाला कडाडून विरोध करण्यात आला. विशेषतः नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार सीमा हिरे (Seema Hiray) यांनी सुधाकर बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध दर्शवला होता. आता भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी नाराज पदाधिकार्यांना सूचक इशारा दिला आहे. तसेच आगामी महापालिका निवडणुकीतील (Municipal Elections) रणनीतीबाबत देखील सुधाकर बडगुजर यांनी भाष्य केले आहे.
भाजप नेते सुधाकर बडगुजर म्हणाले की, आगामी काळात स्थानिक आणि वरिष्ठ नेते एकत्रित काम करतील. बूथ रचेनवर अभ्यास करणे गरजेचे आहे. ब्लॉक नुसार बूथ रचना करणे गरजेचे आहे. या आधीच्या निवडणुकीत नाशिक पश्चिममध्ये 44 पैकी 18 जागा भाजपला मिळाल्या आहेत. तर 22 जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत. तर नाशिक पूर्वमध्ये 47 पैकी 29 भाजप तर 12 जागा शिवसेनेला मिळाल्या होत्या. नाशिक मध्यमध्ये 31 पैकी 19 भाजपला मिळाल्या. जिथे भाजप पक्षाच्या जागा कमी आहेत तिथे वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. नाशिक पश्चिममध्ये भाजपच्या 35 च्या पुढे जागा नेणार आहे. असे त्यांनी सांगितले.
बडगुजरांकडून नाराजांना सूचक इशारा
तर सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांना विरोध केला होता. याबाबत विचारले असता एकमेकांसमोर निवडणूक लढल्या असतात, त्यांनी विरोध केला हे स्वाभाविक आहे. पण, वरिष्ठ पातळीवर जो निर्णय झाला, तो मान्य करणे कार्यकर्त्यांना बंधनकारक आहे. ते सर्व समजदार आहेत. पक्षाच्या विरोधात कोणी भूमिका घेतील, असे वाटत नाही, असा सूचक इशारा त्यांनी यावेळी दिला.
सुधाकर बडगुजर कोण आहेत?
सुधाकर बडगुजर हे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे विश्वासू सहकारी मानले जात होते. त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात 2007 साली नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून झाली. त्या वेळी त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आणि 2008 साली अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला. 2009 ते 2012 या काळात बडगुजर नाशिक महापालिकेचे सभागृहनेते म्हणून कार्यरत होते. त्यानंतर 2012 ते 2015 दरम्यान त्यांनी महापालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिलं. 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी नाशिक पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मिळवली होती, मात्र दोन्ही वेळा त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर पक्षाने त्यांची शिवसेनेच्या उपनेते पदावर नियुक्ती केली. दरम्यान, सुधाकर बडगुजर यांच्यावर काही गुन्हेगारी प्रकरणांमध्ये आरोप असल्याचंही समोर आलं आहे. अलीकडेच त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून, नाशिकच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे.
https://www.youtube.com/watch?v=dqdp9rbia2s
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.