दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!

नाशिक क्राईम न्यूज : नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव (Nandgaon) तालुक्यातील जातेगाव शिवारात एक अत्यंत धक्कादायक व मन हेलावून टाकणारी घटना घडली असून, मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांचा निर्घृण खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दारूच्या व्यसनातून निर्माण झालेल्या कौटुंबिक वादातून ही पितृहत्येची घटना घडल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी (दि. 05) सकाळी साडेसातच्या सुमारास विठ्ठल तुकाराम गायकवाड (58) यांचा मृतदेह मळ्यातील खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याची माहिती भरत गायकवाड यांनी  नातेवाईकांना दिली. यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली असता, विठ्ठल गायकवाड यांच्या डोक्यावर, तोंडावर व ओठांवर गंभीर जखमा दिसून आल्या. बिछान्यावरही मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले होते. याबाबत पोलिसांना अवगत केल्यानंतर नांदगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून परिसरातील नागरिकांची चौकशी सुरू केली. यावेळी मृताचा मुलगा श्रीकृष्ण गायकवाड घटनास्थळी उपस्थित होता. त्याच्यावर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता मुलगा श्रीकृष्ण याने जमलेल्या लोकांसमक्ष गुन्ह्याची कबुली दिली.

Nashik Crime News : वडील आपल्याला ठार मारतील, मुलाच्या मनात भीती

त्याने सांगितले की, वडील विठ्ठल गायकवाड यांना दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत ते नेहमी शिवीगाळ व मारहाण करत असत. तसेच शनिवारी (दि.03) रोजी शेतात वडिलांनी करंटच्या तारा लावून आपला जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्याने केला. याच वादातून वडील आपल्याला ठार मारतील, अशी भीती मनात निर्माण झाल्याने त्याने टोकाचा निर्णय घेतला. रविवारी (दि.04) रात्री साडेदहा वाजता विठ्ठल गायकवाड हे जेवण करून मळ्यातील खोलीत झोपण्यासाठी गेले असता रात्री 11.30 वाजताच्या सुमारास, श्रीकृष्ण घरातून कोणालाही न कळवता मळ्यात गेला.

Nashik Crime News : मुलानेच वडिलांचा केला खून

वडील झोपेत असल्याची खात्री करून, खोलीतील लोखंडी पाईपने डोक्यावर, तोंडावर व ओठांवर जोरदार वार करत त्यांचा जागीच खून केला  अशी कबुली त्याने स्वतःच दिली. या प्रकरणी मृताचे चुलत भाऊ जगन्नाथ नामदेव गायकवाड यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी मुलगा श्रीकृष्ण गायकवाड याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी श्रीकृष्ण गायकवाड यास ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास नांदगाव पोलीस करत आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Pune Crime News: ‘पैसे आणले नसतील तर घरात येऊ नको’, हुंड्यासाठी विवाहितेचा अमानुष छळ, सासरच्यांकडून बेदम मारहाण; पिंपरी-चिंचवडमधील घटनेने खळबळ

आणखी वाचा

Comments are closed.