लाडक्या बहि‍णींसाठी गुड न्यूज, महिलांना स्वंयपूर्ण उद्योजक बनवण्यासाठी 9 टक्के व्याजदरानं कर्ज

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मुंबई येथे शासकीय महामंडळांच्या महिलांसाठीच्या व्याजपरतावा योजनांची सांगड मुंबई बँकेच्या कर्ज योजनेशी घालण्यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणि विविध महामंडळांमार्फत राबविल्या जाणाऱ्या कर्ज योजनांच्या एकत्रित अंमलबजावणीसंदर्भात निर्णय घेण्यात आला.

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य शासन महिलांना केवळ सन्मान देत नाही, तर त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचाही ठोस प्रयत्न करीत आहे. महिलांना स्वयंपूर्ण उद्योजक बनवण्यासाठी सरकारने आता 9% अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम मुंबई बँक आणि विविध विकास महामंडळांच्या माध्यमातून संयुक्तपणे राबविला जाणार आहे.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थी महिलांना वैयक्तिक व सामूहिक स्वरूपात कर्ज देण्यात येणार असून, त्यातून त्यांना व्यवसाय व उद्योग सुरू करण्यासाठी भांडवली मदत मिळणार आहे. पर्यटन संचालनालय, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ आणि इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ यांच्या माध्यमातून महिलांसाठी विविध कर्ज योजना कार्यान्वित आहेत. या निर्णयामुळे महिलांना उद्यमशीलतेकडे वळण्यासाठी प्रोत्साहन मिळणार असून, त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य वाढणार आहे.

यावेळी मुंबई बँकेचे व्यवस्थापीय संचालक आमदार प्रविण दरेकर, आमदार चित्रा वाघ, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महामंडळाचे प्रतिनिधी, वित्त आणि महिला व बालविकास विभागाचे सचिव तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 11 हप्त्यांची रक्कम जमा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना गेल्या वर्षी जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत लाडक्या बहिणींना 1500 रुपयांप्रमाणं 11 हप्त्यांची रक्कम देण्यात आली आहे. काही महिन्यांमध्ये एका हप्त्याची तर काही महिन्यांमध्ये दोन हप्त्यांची रक्कम एकत्रितपणे देण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मे महिन्याचा हप्ता जून महिन्यात देण्यात आला आहे. लाडक्या बहिणींना आता जून महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे. महायुती सरकारमधील घटकपक्षांना राज्याच्या सत्तेवर पुन्हा बसवण्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वाची ठरली होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्याचं आश्वासन दिलं होतं. आता लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.