राज-उद्धव एकत्र, मंचावर गळाभेट, ठाकरेंची एकजूट, स्टार्ट टू एंड, काय काय घडलं?

राज ठाकरे आणि उदव ठाकरे विजय रॅली मुंबई: संपूर्ण राज्यालाच नाही तर अगदी दिल्लीपर्यंत ज्याची उत्सुकता होती, तो ठाकरे बंधूंचा मेळावा (Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally ) आज (5 जुलै 2025) मुंबईतील एनएससीआय डोममध्ये साजरा करण्यात आला. विजयी मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 19 वर्षांनंतर एका व्यासपीठावर एकत्र दिसले. दुपारी 12.15 च्या दरम्यान राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची स्टेजवर ग्रँड एन्ट्री झाली. ठाकरे बंधूंच्या एन्ट्रीसाठी संपूर्ण डोममधील लाईट बंद करण्यात आली होती आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर फक्त फोकस लाईट ठेवण्यात आली. हा ऐतिहासिक क्षण मोबाईलमध्ये टिपण्यासाठी उपस्थितांनी फ्लॅशलाईटसह व्हिडीओ घेतले. स्टेजवर दाखल होताच  राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांना मिठी मारली. यावेळी संपूर्ण महाराष्ट्र भावूक झाल्याचं दिसून आलं.

विजयी मेळाव्यात पहिला राज ठाकरे यांनी भाषण केलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंचं भाषण झालं. आजचा मेळाव्याला घोषणा हीच आहे कोणताही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा. मराठीकडे कुणी वाकड्या नजरेने पहायचं नाही, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. तुमच्याकडे विधानभवनात सत्ता आहे आणि आमच्याकडे रस्त्यावर सत्ता आहे, असं राज ठाकरेंनी सांगितलं. तर बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते, कोणावरही अन्याय करु नका. पण कोणी अंगावर हात उगारला तर तो हात जागेवर ठेऊ नका. देवेंद्र फडणवीस म्हणतात भाषिक गुंडगिरी सहन करणार नाही. फडणवीसांचे सगळे चेलेचपाटे हेच म्हणतात. पण मराठी माणूस इतर राज्यांमध्ये जाऊन कोणावर भाषिक दादागिरी करेल का? इतर राज्यांमध्ये कोणी असे केले तर भाषिक दादागिरी करणाऱ्या व्यक्तीला चिरुन टाकतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात नेमकं काय काय घडलं?, जाणून घ्या…

पहिले राज-उद्धव यांची गळाभेट, मग आदित्य- अमितचाही हातात हात-

विजयी मेळाव्याच्या सुरुवातील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची स्टेजवर ग्रँड एन्ट्री झाली. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांना मिठी मारली. तर विजयी मेळावा संपल्यानंतर ठाकरे कुटुंबीयांनी एकत्र फोटो काढले. यावेळी उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे, राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे देखील स्टेजवर आल्या. यावेळी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि अमित ठाकरेंनी (Amit Thackeray) देखील स्टेजवर पुढे येत हातात हात मिळवला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे  आणि अमित ठाकरे यांना स्टेजवर बोलावले. यानंतर आदित्य ठाकरे काका राज ठाकरेंच्या बाजूला आणि अमित ठाकरे काका उद्धव ठाकरेंच्या बाजूला उभे राहिले. यावेळी उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंना जवळ घेतल्याचं पाहायला मिळालं.

पूर्ण भाषण- (राज ठाकरे पूर्ण भाषण विजय मेलावा)

मोर्चा निघायला पाहिजे होता. मराठी माणूस एकवटतो याचं चित्र उभा राहीलं असतं. नुसत्या मोर्चाच्या चर्चेने माघार घ्यावी लागली. आजचा मेळावा शिवतीथावर व्हायला हवा होता. परंतु पावसामुळे हे शक्य झालं नाही, असं राज ठाकरे म्हणाले. कोणत्याही वादा पेक्षा महाराष्ट्र मोठा आहे म्हणून उद्धव ठाकरे आणि मी एकत्र आलो आहे. आम्हाला एकत्र आणायचं बाळासाहेब ठाकरे यांना जमलं नाही, कुणालाच जमलं नाही. ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, असं राज ठाकरेंनी सांगितले. आजचा मेळाव्याला घोषणा हीच आहे, कोणताही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा. मराठीकडे कुणी वाकड्या नजरेने पाहायचं नाही, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. तसेत तुमच्याकडे विधानभवनात सत्ता आहे. आमच्याकडे रस्त्यावर सत्ता आहे, असं राज ठाकरे म्हणाले. एक भाषा उभी करायला प्रचंड ताकद लागते. भाषा अशाच उभ्या राहत नसतात. अमित शाह म्हणतात ज्याला इंग्रजी येतं त्याला लाज वाटेल इंग्रजी येते म्हणून. पण तुम्हाला कुठे येते? आम्ही मराठी भाषा कधी लादली का?, हिंदी फक्त 200 वर्षे पूर्वीची आहे, असं राज ठाकरेंनी सांगितले. आमची मुले इंग्रजीत शिकली. माझे वडील श्रीकांत ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे इंग्रजीत शिकले. मग त्यांच्या मराठीवर शंका घेणार का? लालकृष्ण अडवाणी मिशनरी शाळेत शिकले त्यांच्या हिंदुत्वावर प्रश्न घेणार का? उद्या हिब्रू भाषेत शिकेल आणि मराठी भाषेचा कडवट अभिमान बाळगेल तुम्हाला काय प्रॉब्लम आहे?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. एक भाषा सगळ्यांना बांधून ठेवते? कोणती भाषा? संरक्षण दलात विविध रेजिमेंट आहे. एखादी घटना घडली की सगळे तुटून पडतात ना. आज सगळे तुम्ही मराठी म्हणून एकत्र आला आहेत. त्यामुळे आता पुढे जातीपातीचं राजकारण सुरु होईल. आता सुरू केलंय यांनी मीरा भाईंदरला व्यापाराच्या कानफाडात मारली. व्यापाऱ्याला मारलं म्हणतात, पण अजून तर काहीच केलेलं नाही. विनाकारण मारामारी करत नाहीत. मात्र जास्त उठबस केली तर कानाखाली आवाज काढला जाईल, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. तसेच ज्यावेळी असं कराल तेव्हा व्हिडीओ करु नका, त्यांना सांगू द्या, मला मारलं म्हणून, असा सल्लाही राज ठाकरेंनी दिला. नयन शाह नावाचा माझा मित्र आहे. मी त्याला गुजराठी म्हणतो. अतिशय उत्तम मराठी बोलतो. शिवाजी पार्कत फिरताना पु.ल. देशपांडे ऐकतो, असं राज ठाकरे म्हणाले. बाळासाहेब यांच्यासोबतची एक घटना आहे, ती मी विसरू शकत नाही. मी एके दिवशी दुपारी मातोश्रीला बसलो होतो. त्यावेळी प्रकाश जावडेकर आले. बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला आले. सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करायचे आहे, असा निरोप घेऊन आले. मी बाळासाहेब ठाकरे यांना सांगितलं सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करायचं ठरलं आहे. मला त्यांनी सांगितलं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल. असे संस्कार झालेला व्यक्ती मराठीसाठी तडजोड करेल का?, मराठीसाठीची एकजूट कायम राहणं गरजेचे आहे, असं राज ठाकरेंनी सांगितले.

उद्धव ठाकरेंचं संपूर्ण भाषण- (उधव थेकाडी पूर्ण भाषण)

बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी राजकीय व्यासपीठावर भेट आहे. राज ठाकरेंनी माझा सन्मानीय उद्धव ठाकरे असा उल्लेख केला. मी देखील सन्मानीय राज ठाकरे असा उल्लेख करतो. राज यांनी अतिशय चांगली मांडणी केली आहे. आज आजच्या भाषणा पेक्षा आमच एकत्र दिसणं महत्वाच आहे. आमच्या दोघांतील ‘अंतरपाट’ अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकायची गरज नाही. एकत्र आलो आहे, एकत्र राहण्यासाठी, असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं. मला आज कल्पना आहे, अनेक बुवा महाराज बिझी आहे कोण लिंबु कापतय कोण रेडा कापतोय. माझा आजोबांनी या भोंदूपणा विरोधात लढा दिला होता आणि त्यांच्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं, असं यांचं काम आहे. आता आम्ही दोघे तुम्हाला फेकून देऊ. तुमच्या डोक्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा हात नसतं तर कुठे असता?, मधल्या काळात यांनी सुरू केळं होतं उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं. अरे आम्ही कडवट देशाभिमानी मराठी हिंदू आहोत, असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितले. महाराष्ट्रात मराठी माणूस न्याय मागत असेल आणि तुम्ही त्याला गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत. देवेंद्र फडणवीस यांच वक्तव्य म्हणजे मला सका पाटलांची आठवण येते. त्यावेळी काँग्रेस सत्तेवर होती. मुंबई आपल्या हक्कांची आहे लढलो आणि आपण घेतली, असं उद्धव ठाकरे म्हणाले. हिंदीसक्ती आम्ही लावून घेत नसतो. उद्धव ठाकरे  यांनी निर्णय आणला म्हणता, मी एवढं काम करत होतो तर सरकार पाडलं कशाला?, महाराष्ट्रात मराठी सक्ती केल्यावर तो भेडिया बोलतोय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मराठी माणूस मुंबई बाहेर नेला असं तुम्हाला वाटत असेल तर 2014 नंतर मुंबईतील उद्योगधंदे गुजरातला गेले कसे? तुम्ही आमच्यात गद्दरी केली आणि आमचं सरकार पाडलं. तुमचे मालक तिकडे गुजरातला बसले आहेत. दोन व्यापारी त्यांच्यासाठी तुम्ही करत आहात.  आम्ही एकत्र येणार म्हंटल की हे भांडण लावतील. अरे आमचा म महापालिकेचा नाही, आमचा म महाराष्ट्राचा आहे, असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितले. विधानसभेत बटेंगे तो कटेंगे म्हणाले. हिंदू मुस्लिम तर केलं, परंतु मराठी अमराठी देखील केलं. त्यांनी गुजरात मध्ये एकेकाळी पटेल लोकांना भडकवलं आणि पटेल विरुद्ध बाकी एकत्र केले. राजस्थानमध्ये तेच केलं. जाट समाज भडकवला आणि इतर त्यांच्या विरोधात उभे केले. इथ देखील तेच महाराष्ट्रात केलं मराठा समाजाला भडकवलं आणि बाकी एकत्र केले. बटेंगे तो कटेंगे म्हणाले, पंतप्रधानाना लाज वाटायला पाहिजे, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला. दोन बातम्या आल्या आहेत लाडकी बहीण पोर्टल बंद होणार आणि राज्य कर्जबाजारी केलं. मराठी भाषा भवन जागा हे त्यांच्या मित्रांच्या घशात घालत आहे. कुठे गेला मराठी अभिमान?, कुणाच्याही लग्नात भाजपला बोलावू नका. लग्नात येतील पुऱ्या श्रीखंड खातील आणि नवरा बायकोत भाडणं लावून दुसऱ्या लग्नात जातील कदाचित मुलगीच पळवून नेतील.  काल एक गद्दार बोलला जय गुजरात… अरे किती लाचार होणार. पुष्पा चित्रपटात दाढीवर हात फिरवून म्हणतो झुकेगा नहीं साला हा म्हणतो उठेगा नहीं साला…आताच उघडा डोळे बघा नीट, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंचं UNCUT भाषण, VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=Q7M4CVJFE-O

राज ठाकरेंचं UNCUT भाषण, VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=3grx3hitwna

संबंधित बातमी:

Aditya Thackeray And Amit Thackeray VIDEO: आदित्य राज ठाकरेंच्या बाजूला; अमितला उद्धव ठाकरेंनी जवळ घेतलं, अख्खा महाराष्ट्र भावूक

Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally: मराठीजनाला हवाहवासा क्षण; राज-उद्धव यांची गळाभेट, विजयी मेळाव्यातील टॉप 10 फोटो

आणखी वाचा

Comments are closed.