ट्रकला मंच बनवलं, बाळासाहेबांच्या स्टाईलने भाषणं, मीरा भाईंदरमध्ये सेना-मनसे एकवटली

Marathi Morcha in Mira bhayandar: मिरा भाईंदरमधील मराठी मोर्चाच्यानिमित्ताने मंगळवारी मुंबईतील राजकीय वातावरण अनेक दिवसांनी तापलेले पहायला मिळाले. राज-उद्धव ठाकरे यांच्या एकत्र मेळाव्यानंतर मंगळवारी प्रथमच ठाकरे आणि मनसे गटाने एकत्र आंदोलन केले. हे आंदोलन कमालीचे यशस्वी ठरले. कारण या आंदोलनाच्या निमित्ताने एकेकाळी शिवसेनेचाच भाग असलेला मनसे (MNS) आणि ठाकरे गट या दोन्ही सेना एकत्र आल्या आणि प्रचंड मोठे आंदोलन उभे राहताना दिसले. सुरुवातीला मीरा-भाईंदरमधील (मीरा भयंदर) या मोर्चाला परवानगी नाकारुन पोलिसांनी ठाकरे गट आणि मनसेच्या हातात आयते कोलीत दिले. त्यानंतर सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांमध्ये या मराठी मोर्चाच्या भूमिकेवरुन प्रचंड विसंवाद दिसून आला. शिंदे गटाच्या प्रताप सरनाईक यांनी थेट सरकार आणि पोलिसांच्या विरोधात भूमिका घेत मोर्चात सामील होण्याची घोषणा केली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांची बाजू कशी योग्य आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, या सगळ्यामुळे मनसे आणि ठाकरे गटाला मीरा-भाईंदरमध्ये अनुकूल असा राजकीय पीच उपलब्ध झाला. त्याचा पुरेपूर वापरत करत मनसे आणि ठाकरे गटाने मराठी एकीकरण समितीच्या साहाय्याने मीरा-भाईंदरमध्ये मोठे आंदोलन करुन दाखवले. या आंदोलनाच्यानिमित्ताने मुंबईच्या राजकारणात मराठीचा मुद्दा ट्रम्प कार्ड ठरु शकतो, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.

सुरुवातीला पोलिसांनी मिरारोडमधील बालाजी हॉटेल चौक परिसरातून मोर्चा काढण्यास मज्जाव केला होता. मात्र, दोन तासांनी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड थांबवली आणि ते आक्रमक भूमिकेतून एकदम कोशात गेले. त्यामुळे मनसे, ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समितीने बालाजी हॉटेल चौकातून मोर्चा काढला. हा मोर्चा शांतीनगर परिसरातून जाणार होता. हा परिसर गुजराती आणि जैनबहुल लोकसंख्येचा आहे. केवळ येथून जाण्यासाठी मोर्चाला मज्जाव करण्यात आला. यानंतर हा मराठी मोर्चा मजल दरमजल करत मीरारोड रेल्वे स्थानकाच्या परिसरात पोहोचला. याठिकाणी आंदोलकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. मोर्चा मिरारोड स्थानकापर्यंत पोहोचल्यानंतर त्याठिकाणी ठाकरे गटाचे राजन विचारे आणि मनसेचे संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई  दाखल झाले. या सगळ्या नेत्यांनी येथील ट्रकच्या मागच्या भागात उभे राहून जोरदार भाषणे केली. राजन विचारे, संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांच्या भाषणाला मनसे-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा जबर प्रतिसाद मिळताना दिसला.

या सगळ्या घडामोडींमुळे आज सकाळपासून राजकीय वर्तुळात आणि प्रसारमाध्यमांवर या आंदोलनाचा बोलबाला राहिला. हा मराठी मोर्चा  म्हणजे अलीकडच्या काळात ठाकरे गट आणि मनसेने केलेल्या एका यशस्वी आंदोलनापैकी एक ठरला आहे. मनसे आणि ठाकरे गट एकत्र आल्यास आंदोलन आणि राजकीय पातळीवर काय होऊ शकते, याची ही पहिली लिटमस टेस्ट होती. या परीक्षेत ठाकरे गट आणि मनसे यशस्वी ठरल्याचे तुर्तास दिसत आहे.

आणखी वाचा

मीरा भाईंदरमध्ये बंदी झुगारली, मराठी मोर्चा ठरलेल्या मार्गानेच निघाला, धरपकडीनंतर मनसैनिक आक्रमक!

अमराठी व्यापाऱ्यांना परवानगी, मग मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाही? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं….

मोर्चाला परवानगी नाकारलेय, कलम 144 लागू, एकत्र जमू नका; मीरा-भाईंदरमध्ये पोलिसांची फायनल वॉर्निंग

आणखी वाचा

Comments are closed.