…तर उद्या कुणीही उठून मराठा कार्यकर्त्यांना मारतील, हिसाब बराबर होगा; शिंदे गटाच्या प्रवक्त्य

सूरज चवन: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा विधीमंडळात मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, अखिल भारतीय छावा संघटनेने (Chhava Sanghatna) रविवारी लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या समोर तीव्र संताप व्यक्त केला. या वेळी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक निषेध म्हणून सुनील तटकरे यांच्या समोर पत्ते उधळले. या घटनेनंतर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केल्याचे दृश्य व्हिडीओत स्पष्ट दिसून आले. ही मारहाणीची घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, विरोधकांनी महायुती सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. आता शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते योगेश केदार (Yogesh Kedar) यांनी सूरज चव्हाण यांना थेट इशारा दिलाय.

खाते समान असेल

शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते योगेश केदार यांनी त्यांच्या समाज माध्यमावर म्हटले आहे की, सूरज चव्हाणने दिलगिरी व्यक्त केली. पण, आधी मारायचे अन् दिलगिरी व्यक्त करून पांघरून घालायचे ही अनीती सुरू झालीय. सूरज चव्हाणला जर आज धडा शिकवला नाही तर उद्या कुणीही उठून मराठा कार्यकर्त्याना मारतील. हिसाब बराबर होगा, असा इशारा त्यांनी सूरज चव्हाण यांना दिला आहे.

सूरज चव्हाणांना राजीनामा देण्याच्या अजित पवारांच्या सूचना

दरम्यान, या मारहाणीच्या घटनेनंतर सूरच चव्हाण यांच्यासह 12 जणांवर लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सूरज चव्हाण यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी छावा संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याच्या सूचना दिल्या आहेत. काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे.

सूरज चव्हाणांची प्रतिक्रिया

सूरज चव्हाण यांनी मारहाणीच्या प्रकरणावर एक्सवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, महाराष्ट्राला यशवंतरावजी चव्हाण यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याचा वारसा आहे. त्यांचाच आदर्श मानून आमचे नेते अजितदादा पवार काम करतात. अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करताना महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला धक्का लागणार नाही याची काळजी आम्ही घेत आलो आहोत. मात्र अलीकडच्या काळात काही घटक आमच्या नेतृत्वावर अत्यंत हीन पातळीवरची टीका करीत आहेत. त्याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात संताप होता. छावा संघटना ही अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे, त्यामुळे आम्हाला ती बंधू संघटना वाटते. त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देणे किंवा त्यांच्या अंगावर पत्त्याची पाने भिरकावणे हे आम्ही समजू शकतो. तो त्यांच्या अभिनव आंदोलनाचा प्रकार असू शकतो. परंतु तिथून निघताना संबंधितांनी आमच्या नेत्यांबद्दल अत्यंत घाणेरडे उल्लेख करीत शिवीगाळ केली. ते ऐकून कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्तपणे मारहाणीचा प्रकार घडला. अर्थात तो घडायला नको होता. परंतु दुर्दैवाने घडून गेला. त्याबद्दल आम्ही जाहीर दिलगिरी व्यक्त करतो, असे सूरज चव्हाण यांनी म्हटले आहे.

https://www.youtube.com/watch?v=S9ytsyz9viw

आणखी वाचा

Suraj Chavan: छावाच्या कार्यकर्त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारणाऱ्या सुरज चव्हाणांवर अखेर गुन्हा दाखल, शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना

आणखी वाचा

Comments are closed.