धारदार शस्त्रांनी डोक्यात वार, हातांच्या नसा कापल्या… पोलिसांच्या ‘त्या’ प्रश्नावर नातू गोंधळ

रायगड: रायगड जिल्ह्यातील म्हसळा (Mhasala) शहरात 31 जुलै संध्याकाळी 5 ते 6 वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना समोर आली होती. घरात एकटे असलेल्या 72 वर्षीय वृद्धाचा गळा चिरून डोक्यात लोखंडी रॉडने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. प्रथमदर्शनी हा प्रकार अनोळखी व्यक्तीने केला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, पोलीस तपासामध्ये खऱ्या आरोपीची ओळख पटली. हत्या करणारा दुसरा तिसरा कोणी नसून, मृत वृध्द व्यक्तीचाच नातू निघाला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी खाक्या दाखवला तेव्हा…

म्हसळा पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या 18 वर्षीय मोहमद असगर अली परदेशी याने त्याचे आजोबा शौकत अली हुसेनमियाँ परदेशी (वय 72 वर्ष) यांची हत्या केली. यानंतर त्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी प्लॅन देखील आखला. आजोबांची हत्या झाली. एक जण त्यांना मारुन घरातून पळून गेल्याचा बनाव त्याने उभा केला. त्याने आपल्या डोक्यावर मारेकऱ्याने कापड टाकल्याचंही सांगितलं, पण पोलिसांनी शेजाऱ्यांकडून घेतलेल्या माहितीनुसार आणि त्याच्या हातावर झालेल्या जखमांची चौकशी केली, पोलिसांनी खाक्या दाखवला तेव्हा संपूर्ण पितळ उघडं पडलं.

सुरीने गळ्यावर वार केले..,

आजोबा गाढ झोपेत असताना तो लोखंडी रॉड आणि घरातील धारदार सुरी घेऊन आजोबा यांच्या खोलीत गेला. मोहमद असगर अली परदेशी याने त्याच्या हातात असणाऱ्या लोखंडी रॉडने आजोबा शौकत अली परदेशी यांच्या डोक्यात जोरदार वार केला. त्यानंतर सुरीने गळ्यावर वार केले, तसेच दोन्ही हातांचे मनगटाच्या नसा कापून त्यांना संपवलं.

मोहमद असगर अली परदेशी याच्या अंगावर झालेल्या जखमा बघून पोलिसाचा संशय बळावला. पोलिसांनी त्याला प्रथम विश्वासात घेऊन विचारणा करीत असतानाच पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने आजोबा शौकत अली परदेशी यांची हत्या केल्याचे कबूल केले. म्हसळा पोलिसांना या गुन्ह्याचा छडा अवघ्या तीन तासांत लावला आहे. म्हसळा पोलीस ठाण्यात हत्येची नोंद झाल्यानंतर म्हसळा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे आणि सहकारी यांनी या गुन्ह्याची माहिती घेत असताना अवघ्या तीन तासांत उलगडा करत हत्येचा बनाव करणारा नातू मोहमद असगर अली परदेशी हाच खुनी असल्याचे स्पष्ट झाले.

आजोबा सारखे टोमणे मारायचे

‘तुम कितना भी पढ लो, तेरा कुछ नही हो सकता’, ‘तुम ऐसेंही रहोगे’, असे टोमणे आजोबा सतत नातवाला मारत होते. त्यामुळे रागाच्या भरात आजोबांचा खून केल्याची माहिती आहे.

अतिरिक्त निर्मिती

नातू मोहमद असगर अली परदेशीने आपल्या आजोबांना मारलं अन् बनाव केला की, एका अनोळखी इसम तोंडावर कपडा बांधून घरात प्रवेश केला. त्यानंतर तो आजोबा शौकत अली परदेशी यांच्या खोलीमध्ये गेला. त्यानंतर त्याने धारदार शस्त्राने शौकत परदेशी यांच्या मानेवर हातावर व डोक्यावर वार करून पळून जात असताना शौकत यांच्या नातवाने त्या अज्ञात व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी हा त्यापेक्षा शक्तीवान आणि मजबूत असल्याने तो पळाला असल्याची माहिती मयत शौकत अली परदेशी यांचा नातू मोहमद असगर अली परदेशी याने म्हसळा पोलिसांना दिली. पोलिसांचा तपास हा अज्ञात व्यक्तीच्या शोध घेण्यामागे भरकटेल आणि आपल्यावर कोणीही संशय घेणार नाही असा फिल्मी स्टाईल समज करीत बनाव केला. पण काही तासातच पोलिसांनी खऱ्या गुन्हेगाराला समोर आणलं.

केवळ काही तासांत पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल, उपविभागीय पोलिस अधिकारी सविता गर्जे यांनी या खूनप्रकरणी तत्काळ मार्गदर्शन व सूचना केल्या होत्या. त्यानंतर केवळ काही तासांत आरोपीला ताब्यात घेतले. तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप कहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर एडवळे हे करत आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.