रायगडावर इलेक्ट्रिक वाहने वापराविना उघड्यावरच पडून; मंत्र्यांसाठी उधळपट्टी, प्रशासनाचा बेफिकीरपणा

>> शीतल धनवडे

शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये, अशी आपल्या प्रशासनाला सक्त सूचना देऊन रयतेची काळजी घेणारे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. पण स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर मंत्र्यांसाठी आणलेली दोन इलेक्ट्रिक वाहने गेल्या सहा महिन्यांपासून वापराविना पडून आहेत. ऊन, वारा आणि पावसात उघडय़ावरच असलेल्या या वाहनांची अवस्था पाहता, मंत्र्यांसाठी नाहक लाखो रुपयांची केलेली ही उधळपट्टी आणि प्रशासनाचा बेफिकीरपणा पाहता गडावर येणाऱया शिवभक्तांसह पर्यटकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ही वाहने अशीच पडून वाया जाण्यापेक्षा गडावर येणाऱया पर्यटकांसाठी त्याचा वापर व्हावा, अशी मागणी होऊ लागली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला किल्ले रायगड हा आजही सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असल्याने नेहमी शिवभक्तांसह पर्यटकांनी गजबजलेला असतो. सध्या दिवाळीच्या सुट्टीमुळे गडावर दररोज आबालवृद्धांसह हजारो पर्यटकांची गर्दी होत आहे. पायी चालण्यासह गडावर जाण्यासाठी रोप-वेची व्यवस्था आहे.रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून गडावर विविध कामे सुरू आहेत. पुरातत्व विभागाकडून ठिकठिकाणी टप्प्याटप्प्याने उत्खनन सुरू आहे.सहा महिन्यांपूर्वी एप्रिलमध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गडावरील कार्यक्रमांसाठी हजेरी लावली होती. गोल्फ खेळांमध्ये वापरण्यात येणाऱया वाहनांप्रमाणे लाखो रुपये खर्चून दोन इलेक्ट्रिक वाहने गडावर नेण्यात आली. अवघ्या काही मिनिटांसाठी आणलेली ही वाहने होळीच्या माळावरून बाजारपेठेकडे जाताना, लगतच तशीच उघडय़ावर ठेवण्यात आली आहेत.

गेल्या सहा महिन्यांपासून अधिक काळ उैन, वारा, पावसाचा मारा झेलत ही वाहने उघडय़ावर तशीच पडून राहिल्याने ती अक्षरशः सडून जात आहेत. याची स्थानिक जिल्हा प्रशासनासह कोणाला कसलीच फिकीर नसल्याचे दिसून येत आहे. वापराविना तशीच ही वाहने पडून राहण्यापेक्षा गडावर येणाऱया आबालवृद्ध शिवभक्त पर्यटकांसाठी तरी सशुल्क वापरण्याची सोय करावी, अशी मागणी होत आहे.

Comments are closed.