धनंजय मुंडेंचे मुंबईत तीन फ्लॅट; करुणा शर्मांचा मोठा दावा, म्हणाल्या माझा फ्लॅटदेखील…
मुंबई: मुंबईमध्ये स्वतःचे आलिशान घर असतानाही राष्ट्रवादी नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हे सरकारी निवासस्थान असलेल्या सातपुडा या निवासस्थानात राहत असल्याचं समोर आलं आहे. मुंबईत आपल्याकडे घर नसल्याने आपण सरकारी निवासस्थानात राहत असल्याची काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंनी माध्यमांना माहिती दिली होती. मात्र आता मुंडेंच्या नावे गिरगाव चौपाटी येथील एन एस पाटकर मार्गावर वीरभवन इमारतीत घर असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी करुणा शर्मा यांनी मोठा दावा केला आहे.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे मुंबईत तीन फ्लॅट असल्याचं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे. मलबार हिल, पवई आणि सांताक्रुज येथे तीन फ्लॅट असल्याचा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे. खोटं बोलून सरकारी बंगल्याचा लाभ घेत असल्याचा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे. सांताक्रुज येथील घरी तुम्ही दोघे पती-पत्नी राहण्यासाठी या. मी दुसरीकडे भाड्याने घर घेऊन राहील. मंत्री पद मिळेल असं वाटत असेल तर ते आता शक्य नाही तुमचे आमदारकी देखील जाणार असल्याचं करूणा यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाल्यात करूणा शर्मा?
धनंजय मुंडे यांनी जनप्रतिनिधी असताना लाज सोडली आहे, मुंबईमध्ये स्वतःचं घर असताना आणि ते खोट्या गोष्टी सांगत आहे. ते म्हणतात माझी प्रकृती चांगली नाही. मुलीचं शिक्षण आहे. त्याच्यासाठी मी इथे राहतो. पण धनंजय मुंडे यांच्या मालाबार हिलमध्ये फ्लॅट आहे. हा सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या शपथ पत्रामध्ये त्यांनी त्याची माहिती दिली आहे. त्यांचा पवईमध्ये देखील एक फ्लॅट आहे. ज्या फ्लॅटमध्ये मी आत्ता राहत आहे तो देखील त्यांचाच आहे. तुम्ही मला दिलेला फ्लॅट तुमचाच आहे, माझा फ्लॅट आहे तो पण तुमचाच आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या दुसऱ्या बायको सोबत राहायला इथे यायचं असेल तर इथे येऊन राहा. आम्ही दुसरीकडे जाऊन राहतो. पण जे शासकीय निवासस्थान आहे ते तुम्ही सोडा. हे मी तुम्हाला माध्यमांच्या मार्फत एक नोटीस देते आहे. शासकीय निवासस्थान सोडा आणि माझ्या घरी राहायला या, मी तिथून बाहेर राहायला जाते. तुम्हाला जर असं वाटत असेल तुम्हाला परत मंत्री पद मिळेल त्यामुळे तुम्ही तिथेच राहू शकता, तर असं कधीही होणार नाही. तुमची आमदारकी देखील जाणार आहे, त्यामुळे मंत्रीपदाचं स्वप्न तुम्ही बघू नका, सांताक्रुजचा फ्लॅट आहे, तिथे तुम्ही येऊन राहू शकता, ते शासकीय निवासस्थान लवकरात लवकर खाली करा, असंही करूणा शर्मा यांनी म्हटलं आहे.
कृषीमंत्रीपद जाऊन तब्बल पाच महिने उलटले तरी…
धनंजय मुंडेंचे कृषीमंत्रीपद जाऊन तब्बल पाच महिने उलटले आहेत, तरीही धनंजय मुंडे यांनी सरकारचे ‘सातपुडा’ हे निवासस्थान रिकामं केलेलं नाही. मुंबईत आपल्याला कुठेही घर नसल्यामुळं बंगला सोडला नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी आधी माध्यमांशी बोलताना दिलं होतं. अशातच गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी मुंबईत गिरगाव चौपाटीवर असलेल्या या घराचा उल्लेख केलेला आहे. हे घर सध्या वापरामध्ये नाही, अशी माहिती आहे. यामुळे आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे चर्चेत आले आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.