बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालाचा अर्थ काय? राज-उद्धव ठाकरेंना कोणती चूक नडली?

मुंबई सर्वोत्तम निवडणुकीचा निकालः राज आणि उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र आल्यामुळे यंदाची बेस्ट पतपेढीची निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती. या निवडणुकीत ठाकरे बंधू आणि महायुतीच्या पॅनेलमध्ये मुख्य लढाई होईल, असा अंदाज होता. मात्र, हा अंदाज चुकवत शशांक राव यांच्या पॅनेलने 21 पैकी 14 जागा जिंकत बाजी मारली. महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनेलने 7 जागांवर विजय मिळवला. तर ठाकरे बंधूंना भोपळाही फोडता आला नाही. त्यासाठी ठाकरे गटाची गेल्या काही वर्षातील बेस्टमधील निष्क्रियता कारणीभूत असल्याची चर्चा आता रंगली आहे.

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचा निकाला हा तेवढ्यापुरताच मर्यादित असला तरी विजय हा विजयअसतो. ठाकरे गटाने बेस्ट प्रशासनातील जुनी माणसं बदलणं आणि नवीन माणसांना पुढे आणण्यात कमालाची निष्काळजीपणा दाखवला. बेस्टमध्ये मनसेचे अस्तित्व फार नव्हतेच. या सगळ्याचा फटका ठाकरे बंधूंना बसला, असे मत ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य यांनी व्यक्त केले. ते बुधवारी ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

शशांक राव यांच्या पॅनेलने सर्वांचा अंदाज चुकवत 14 जागा जिंकल्या. शशांक राव यांचे वडील शरद राव हे कामगार नेते होते. मुंबई महानगरपालिकेत 25 वर्षे शिवसेना-भाजपची सत्ता असताना आणि बाळासाहेब ठाकरे व गोपीनाथ मुंडे हयात असतानाही पालिकेच्या अंतर्गत कामगार संघटनेत शरद राव यांचे वर्चस्व कायम राहिले होते. शशांक राव यांनीही त्यांच्या वडिलांप्रमाणे कामगार संघटनांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं केली आहेत. त्यांनी बेस्टमध्ये अनेक आंदोलनं केली. त्यामुळे बेस्टचा कर्मचारी वर्ग त्यांच्यासोबत राहिला. शशांक राव भाजपमध्ये असले तरी त्यांनी या निवडणुकीत स्वत:चे स्वतंत्र पॅनेल उभे केले होते. त्यांना 14 जागांवर विजय मिळाला. भाजपच्या प्रसाद लाड, शिंदे गटाचे किरण पावसकर आणि नितेश राणे यांनी एकत्र येऊन उभ्या केलेल्या सहकार समृद्धी पॅनेलला 7 जागा मिळाल्या. तर ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलचं पानिपत झालं. या गोष्टीचा ठाकरे बंधुंना विचार करावा लागेल. विशेषत: उद्धव ठाकरे यांना विचार करावा लागेल. बेस्टमध्ये जुनी माणसं बदलणं आणि नवीन लोक देणं आणि संघटनेच्या कर्मचाऱ्यांच्या कामांचा नियमित आढावा घेणे, याबाबत उद्धव ठाकरे यांनी हलगर्जीपणा केला. ते पूर्णपणे निष्काळजी राहिले. यामुळेच बेस्टमध्ये ठाकरे गटाला उतरती कळा लागली, असे मत संदीप आचार्य यांनी व्यक्त केले.

Raj Thackeray & Uddhav Thackeray: मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरे बंधूंना विचार करण्याची गरज

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचा निकाल पाहता आता आगामी मुंबई महानगरापलिकेच्यादृष्टीनेही ठाकरे बंधूंना विचार करावा लागेल. महानगरपालिका निवडणुकीत प्रचार कसा करायचा, हे ठरवावे लागेल. मुंबई महानगरपालिकेवर 25 वर्षे शिवसेना-भाजपची सत्ता असताना आतमध्ये शरद राव यांच्या म्युन्सिपल मजदूर युनियनची ताकद होती. या संघटनेतील मराठी लोक होते, ते आतमध्ये शरद राव यांना साथ द्यायचे आणि बाहेर पालिका आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपला मतदान करायचे. शरद राव आणि शशांक राव यांना बेस्टच्या अंतर्गत राजकारणातही मराठी माणसानेच साथ दिली. पण ठाकरे गट बेस्टमध्ये निष्क्रिय राहिला. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हक्कांसाठी भांडणाऱ्या आणि आंदोलन करणाऱ्या शशांक राव यांना साथ दिली. मात्र, बेस्ट आणि मुंबईचे प्रश्न वेगवेगळे आहेत. त्यामुळे या निकालाच महापालिका निवडणुकीवर विशेष परिणाम होणार नाही. त्याठिकाणी वेगळे चित्र पाहायला मिळू शकते, असे मत ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य यांनी व्यक्त केले.

https://www.youtube.com/watch?v=cokko8ixtni

आणखी वाचा

बेस्ट निवडणुकीच्या मतमोजणीत ट्विस्ट, मध्यरात्री पुन्हा मतं मोजली अन् निकाल बदलला, नेमकं काय झालं?

आणखी वाचा

Comments are closed.