गोंदिया हादरला! बापाच्या मारहाणीचा बदला; डोळ्यात लालमिर्ची टाकून तलवारीने संपवलं
गोंडिया क्राइम न्यूज: वडिलांना झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी दोन तरुणांनी मिळून एका विटभट्टी चालकाची निर्घृण हत्या केली. गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील पोकरटोला जंगल परिसरात ही धक्कादायक घटना घडली. मृतकाचे नाव विनोद देशमुख असून, तो घाटटेमणी येथील विटभट्टीवर चालक म्हणून काम करत होता. वडीलांना मारहाण केल्याचा बदला घेण्यासाठी डोळ्यात लालमिर्ची पावडर टाकून तलवारीने हत्या केली. विटभट्टी मालकाच्या हत्या प्रकरणी दोन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे प्रशांत कावडे आणि कामेश कावडे अशी आहेत.
नेमके घडले काय?
काही दिवसांपूर्वी विनोद देशमुख याने आरोपींच्या वडिलांना मारहाण केली होती. त्याचा राग मनात धरून आरोपींनी बदला घेण्यासाठी खूनाचा कट रचला. या कटांतर्गत त्यांनी विनोदला फसवून आपल्याबरोबर घेतले आणि पोकरटोला परिसरात नेले. तेथे प्रथम त्याच्या डोळ्यांत लाल मिरची पावडर टाकण्यात आली, ज्यामुळे तो क्षणभरात निष्प्रभ झाला. त्यानंतर धारदार लोखंडी तलवारीने त्याच्यावर वार करून त्याचा खून करण्यात आला. हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह लपविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी विनोदच्या दुचाकीवर मृतदेह ठेवून पोकरटोला जंगलात नेऊन फेकून दिला. काही तासांनंतर स्थानिकांना मृतदेह दिसून आला आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच रावणवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
पोलीस तपासात कारण उघडकीस
पोलीस तपासादरम्यान हत्येमागील कारण स्पष्ट झाले. मृतकाने केलेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठीच आरोपींनी हत्या केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी काही तासांतच आरोपींचा शोध घेतला आणि त्यांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे प्रशांत कावडे आणि कामेश कावडे अशी आहेत. या प्रकरणाचा तपास गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर तसेच रावणवाडी पोलीस स्टेशनचे निरीक्षक वैभव पवार यांच्या नेतृत्वाखालील पथक कार्यरत आहे. पोलिसांनी हत्या करण्यासाठी वापरलेली तलवार आणि इतर पुरावे हस्तगत केले असून, आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. एका किरकोळ वादातून थेट खुनापर्यंत गेलेल्या या प्रकाराने समाजात संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावात यापूर्वीही छोट्या-छोट्या कारणावरून वाद व्हायचे, परंतु एवढ्या क्रूर पद्धतीने हत्या होईल, याची कुणालाही कल्पना नव्हती.
आणखी वाचा
Comments are closed.