सरकारी कर्मचाऱ्यांचा ऑगस्टचा पगार 5 दिवस अगोदर होणार, लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता कधी?

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 13 हप्त्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे. महायुती सरकारनं जुलै 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. त्या योजनेनुसार पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. राज्य सरकारनं गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना ऑगस्ट महिन्याचा पगार 5 दिवस अगोदर देण्याचा निर्णय घेतला आहे. आता लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे पात्र लाभार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवस अगोदर पगार

गणेशोत्सवाच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी त्यांचे ऑगस्टचे वेतन 26 ऑगस्ट रोजी देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. राज्य सरकारनं शासन निर्णय काढून 1 सप्टेंबर रोजी होणारे कर्मचारी व अधिकार्यांचे वेतन 26 ऑगस्ट रोजी देण्यास सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह परिषद, मान्यता प्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था,  अकृषि विद्यापीठे/ कृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविदयालयांचे अधिकारी व कर्मचारी तसेच निवृत वेतनधारकांन / कुटुंब निवृत वेतन धारक यांनाही हा निर्णय लागू राहणार आहे.

लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाल्यानंतर सुरु असलेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना त्या महिन्याचे 1500 रुपये दिले जायचे. गेल्या काही महिन्यांपासून त्यामध्ये बदल झालेले दिसून येतात. जुलै 2025 महिन्याच्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्यापूर्वी देण्यात आले. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार एका कुटुंबातील दोन महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. काही ठिकाणी एकाच कुटुंबातील तीन महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. अंगणवाडी सेविकांकडून गृहचौकशी करुन एका कुटुंबातील लाभ घेणाऱ्या तीन महिलांपैकी एका महिलेचं नाव कमी करण्याची प्रकिया करण्यात येणार आहे. दुसरीकडे महिला व बालविकास विभागानं दिलेल्या माहितीनुसार ग्रामविकास विभागानं जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या काही महिला कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्यानं त्यासंदर्भातील चौकशी आणि कारवाई संदर्भातील प्रक्रिया सुरु केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार याकडे लक्ष लागलं आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.