रेल्वे प्रवाशांना अतिरिक्त लगेजसाठी कोणताही दंड द्यावा लागणार नाही :अश्विनी वैष्णव

नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे प्रवासात विमान प्रवासासारखा अतिरिक्त वजनाचा नियम लावला जाणार असल्याचं वृत्त फेटाळलं. अश्विनी वैष्णव म्हणाले की गेल्या अनेक दशकांपासून असा नियम आहे की प्रवासी किती वजनापर्यंतचं साहित्य घेऊन जाऊ शकतात. मात्र नवा कोणताही नियम बनवलेला नाही. याचा अर्थ असा नाही की त्या वजनापेक्षा अधिक वजन असल्यास अधिक भाडं वसूल केलं जाईल. अश्विनी वैष्णव आजतक सोबत बोलत होते.

भारतीय रेल्वे आता हवाई प्रवासाप्रमाणं लगेज नियम लागू करणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं.  ज्यानुसार जादा साहित्य सोबत घेऊन गेल्यास लगेजच्या वजनानुसार  अतिरिक्त भाडं वसूल केलं जाईल. रिपोर्टमध्ये असं सांगितलं गेलं होतं की हा नियम पहिल्यापासून असून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. त्या नियमानुसार ठराविक वजनापर्यंत साहित्य मोफत घेऊन जाता येईल मात्र त्यापेक्षा अधिक साहित्य घेऊन जाण्यास अतिरिक्त भाडं द्यावं लागेल, असं वृत्त प्रसिद्ध झालं होतं.

यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार रेल्वे प्रवासात एसी, थ्री टियर एसी, स्लीपर क्लास आणि जनरल कोच यानुसार अतिरिक्त भाड्याशिवाय साहित्य  घेऊन जाण्यास परवानी असेल असं सांगण्यात आलं होतं. फर्स्ट क्लास एसी कोचसाठी 70 किलो वजन, एसी सेकंड क्लास साठी 50, थर्डएसी आणि स्लीपकर क्लाससाठी 40 किलो आणि जनरल तिकिटावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी 35 किलोपर्यंत वजनाचं साहित्य घेऊन जाण्यास परवानगी असल्याचं सांगण्यात येत होतं.

यापूर्वीच्य रिपोर्टसमध्ये विमानतळावर ज्या प्रमाणं लगेजच्या प्री बुकिंगची सुविधा सुरु करण्यात आलीय असं सांगण्यात  आलं होतं. निश्चित करण्यात आलेल्या मर्यादेपेक्षा अधिक वजनाची बॅग किंवा ब्रीफकेस असल्यास प्रवाशांना दंड केला जाईल, अशा तरतुदी असल्याचं सांगण्यात आलं होतं. लगेजच्या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी रेल्वे स्टेशनवर इलेक्ट्रॉनिक लगेज मशीन लावल्या जातील असं सांगण्यात आलं होतं. प्रवाशानं रेल्वे प्लॅटफॉर्मवर एंट्री करण्यापूर्वी प्रवाशांच्या बँगांचं वजन आणि त्याचा आकार तपासला जाईल, असं सांगण्यात आलं होतं. लगेज नियमाबाबत सुरु असलेल्या वेगवेगळ्या चर्चा अश्विनी वैष्णव यांनी फेटाळल्या आहेत.

बिहारसाठी 12 हजार विशेष ट्रेन चालवणार

आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवाळी आणि छठपुजेनिमित्त 12 हजार स्पेशल ट्रेन चालवल्या जात असल्याच्या विरोधी पक्षांच्या टीकेबद्दल अश्विनी वैष्णव म्हणाले की दिवाळी आणि छठपुजेच्या निमित्तानं लाखो लोक आपल्या घरी जातात. गेल्या वर्षी सात हजार स्पेशल ट्रेन चालवल्या होत्या. महाकुंभच्या काळात मोठ्या प्रमाणावर रेल्वे चालवल्या होत्या. महाराष्ट्रात कोणत्या निवडणुका आहेत तिथं देखील गणपती निमित्त 400 विशेष ट्रेन चालवल्या जात आहेत. आम्ही निवडणूक असलेल्या र्जय बघून नाही तर प्रवाशांच्या सोयीसाठी ट्रेन चालवतो, असं अश्विनी वैष्णव म्हणाले.

आणखी वाचा

Comments are closed.