मनसेतून हकालपट्टी होताच सर्वात आधी कोणी फोन केला? वैभव खेडेकरांनी भर पत्रकार परिषदेत नाव सांगून

Vaibhav Khedekar : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांची पक्षविरोधी कारवायांमुळे मनसेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. काही दिवसांपासून ते भाजप (BJP) किंवा शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena Shinde faction) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. हकालपट्टीनंतर वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच मनसेतून हकालपट्टी करताच सर्वात आधी कोणी फोन केला? याबाबत त्यांनी वक्तव्य केले आहे.

वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, सोशल मीडियावर माझ्यासह जिल्हाध्यक्ष आणि इतर दोघांना बडतर्फ केल्याचे पत्र वाचून अतिशय दुःख वाटले. हे पत्र म्हणजे माझ्या निष्ठेचे सर्टिफिकेट आहे. कोकणात पक्षाची बीजे मी रुजवली आहेत. मी भाजपच्या काही लोकांना भेटलो.  म्हणून मी पक्षांतर करत असल्याच्या संशयावरून माझ्यावर कारवाई करण्यात आली. पण मी पक्षप्रवेश करणार नव्हतो. कार्यकर्त्याला तडीपारीची होणारी कारवाई थांबावी म्हणून मी नितेश राणे यांना भेटलो होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

मनसेतून हकालपट्टी करताच सर्वात आधी कोणी फोन केला?

तर पत्रकार परिषदेत वैभव खेडेकर यांनी त्यांची हकालपट्टी झाल्यानंतर सर्वात आधी कुणाचा फोन आला याबाबत देखील वक्तव्य केले. ते म्हणाले की बडतर्फ झाल्याचे समजल्यानंतर सर्वात पहिला फोन नितेश राणे यांचा आला, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच अनेकांनी मला धीर दिल्याचे देखील वैभव खेडेकर म्हणाले.

मी लवकरच मेळावा घेणार

वैभव खेडेकर पुढे म्हणाले की, फिनिक्स पक्षाप्रमाणे मी पुन्हा उभारी घेईन. माझ्यावर अशा पद्धतीची वेळ येणार असेल तर बाकीच्या पदाधिकाऱ्यांनी विचार करण्याची ही वेळ आहे. झालेली घटना नाकारता येत नाही. हे स्वीकारून मी पुढे जाईल. मला अजिबात घाई नाही. मी योग्य वेळेची वाट पाहून निर्णय घेईल. मी लवकरच मेळावा घेणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. तर चर्चा आणि संवाद झाले तर असे निर्णय घेण्याची वेळ येत नाही, अशी टीका वैभव खेडेकर यांनी पक्षाच्या धोरणावर केली.

वैभव खेडेकर भावूक

हे पत्र स्वतः साहेबांनी काढलं असतं तर तो त्यांचा आदेश आल्याचा आनंद बाळगला असता. मी पक्षाची शिस्त बिघडेल, असे काम कधीच केले नाही. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होतो म्हणून माझ्यावर अनेक कारवाया झाल्या. पक्षासाठी केलेली माझी धडपड आज तोकडी पडली राज ठाकरे साहेब आपण फार घाई केली. तुम्ही कालही मनात होता, आजही आहात आणि उद्याही राहाल, असे म्हणत वैभव खेडेकर पत्रकार परिषदेत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

आणखी वाचा

Vaibhav Khedekar : मोठी बातमी: वैभव खेडेकरांच्या हालचालींचा सुगावा लागताच राज ठाकरेंनी आदेशच काढला; मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

आणखी वाचा

Comments are closed.