पदासाठी नेत्याच्या मागे-पुढे करणं माझा स्वभाव नाही, माझे दोन नंबरचे धंदे नाहीत; तानाजी सावंतांच
शिवाजी सावंत: माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट करत भाजप प्रवेशाची घोषणा केली आहे. “गणेशोत्सवानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर पदासाठी नेत्याच्या मागे-पुढे करणं माझा स्वभाव नाही, माझे दोन नंबरचे धंदे नाहीत, असा हल्लाबोल देखील शिवाजी सावंत यांनी केला आहे.
शिवसेनेत संपर्कप्रमुख पद भूषवणाऱ्या शिवाजी सावंत यांनी पक्षातील अंतर्गत कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत भाजपकडे वळण्याचे कारण सांगितले. “मी संपर्कप्रमुख असताना माझ्या तालुक्यातील तालुकाप्रमुख व शहरप्रमुखांची निवड माझ्या अनभिज्ञतेत झाली. जिल्ह्यातील संपर्कप्रमुख हे महत्त्वाचे पद असूनही मला न विचारता असे निर्णय घेतले गेले. त्यामुळे अशा वातावरणात काम करणे मला योग्य वाटले नाही,” असे ते म्हणाले.
पदासाठी नेत्याच्या मागे-पुढे करणं माझा स्वभाव नाही
“आम्ही स्वाभिमानी लोक आहोत, फोटोसाठी पुढे पुढे करत नाही. नेत्यांच्या मागे धावत पद मिळवणे हा माझा स्वभाव नाही. माझे कोणतेही दोन नंबर धंदे नाहीत किंवा मी कुठे ठेका घेत नाही. शिवसेनेत 30-32 वर्ष काम केलं असून बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्यासोबत काम करण्याचा योग लाभला. शिवसेनेत शिस्त होती, मात्र अलीकडे ती विस्कळीत झाली आहे. कार्यकर्त्यांची गर्दी इतकी वाढली आहे की, वरिष्ठ नेत्यांना स्थानिक पातळीवर लक्ष देणे शक्य होत नाही,” अशी टीका त्यांनी केली आहे.
तानाजी सावंत यांच्याशी मतभेद? शिवाजी सावंत म्हणाले…
भाऊ तानाजी सावंत यांच्या सोबतच्या वादावरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “तानाजी सावंत यांची कर्मभूमी धाराशिव आहे, आणि माझी सोलापूर. त्यामुळे मी सोलापुरात कोणता निर्णय घेतो, हे पूर्णपणे माझं स्वातंत्र्य आहे. त्यांच्या भूमिकेशी याचा काहीही संबंध नाही,” असे शिवाजी सावंत यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादीकडून ऑफर, पण भाजपचा निर्णय कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे
शिवाजी सावंत यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पक्षप्रवेशाची ऑफर आल्याचे बोलले जात होते. याबाबत विचारले असता “माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या माध्यमातून मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र कार्यकर्त्यांची भूमिका भाजपमध्ये जाण्याची होती, त्यामुळे आम्ही तोच निर्णय घेतला,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय इनिंगचा नवा अध्याय भाजपमधून सुरू होणार
शिवाजी सावंत यांच्या या निर्णयामुळे सोलापुरातील भाजपला स्थानिक पातळीवर बळकटी मिळणार असून, शिवसेनेला मात्र पुन्हा एक धक्का बसला आहे. गणेशोत्सवानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली आहे. आता शिवाजी सावंत यांचा पक्ष प्रवेश नेमका कधी होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.