रोहिणी खडसेंच्या सांगण्यानुसार खेवलकरांच्या फोनमधील चॅट डिलीट, पोलिसांच्या दाव्याने खळबळ, सिम द
पुणे: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकरांना अटक करताना पोलिसांनी खेवलकरांचा मोबाईल फोनही जप्त केला होता. मात्र पोलिसांच्या ताब्यात असलेल्या त्या मोबाईलमधील व्हॉट्स ॲप चॅट डिलीट करण्याचा प्रयत्न झाल्याचा पुणे पोलिसांचा दावा आहे. रोहिणी खडसेंच्या सांगण्यावरून व्हॉट्स ॲप चॅट नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा पुणे पोलिसांना संशय आहे . त्यामुळे या प्रकरणाला आणखी नाट्यमय वळण लागण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या ताब्यातील मोबाईलमधील चॅट नष्ट करण्याचा कसा प्रयत्न झाला, पाहुयात या रिपोर्टमधून…
खेवलकरच्या मोबाईलमधील व्हॉटसप चॅट डिलीट
प्रांजल खेवलकरांना अटक करताना पोलिसांनी त्यांच्याकडील दोन मोबाईल फोन देखील जप्त केले होते. त्या पार्टीत अंमली पदार्थ सापडल्याचा पोलिसांचा दावा असल्याने पोलिसांनी खेवलकरांच्या मोबाईलचा तपास सुरु केला. तपासामध्ये खेवलकरच्या दोनपैकी एका मोबाईल फोनमधील सीम कार्ड हे जळगाव मधील सोनार आडनावाच्या व्यक्तीच्या नावावर असल्याचे समोर आले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना अचानक त्यांच्या ताब्यातील खेवलकरच्या मोबाईलमधील व्हॉटसप चॅट डिलीट झाल्याने पोलीस बुचकाळ्यात पडले.
सिमकार्ड हरवल्याची तक्रार अन् नवं सीम घेऊन चॅट डिलीट
जळगाव मधील सोनार आडनावाच्या व्यक्तीच्या नावे असलेले सीम कार्ड 2012 पासून प्रांजल खेवलकर वापरत होते. मात्र जेव्हा खेवलकरांना अटक झाली तेव्हा जळगावमधील सोनार नावाच्या व्यक्तीने त्याचे सिमकार्ड हरवल्याची तक्रार दिली. त्या तक्रारीचा उपयोग करून त्याच नंबरचे दुसरे सिमकार्ड खरेदी केले आणि ते मोबाईलमध्ये टाकून त्या नंबरवरचे सगळे व्हॉटसप चॅट डिलीट केले.
पुणे पोलिसांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्या सोनार नावाच्या व्यक्तीची चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने रोहिणी खडसेंच्या सांगण्यावरून आपण चॅट डिलीट केल्याचं त्यानं पोलिसांना सांगितल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणंय. त्यामुळे रोहिणी खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रकाराबाबत प्रतिक्रिया विचारली असता एकनाथ खडसेंनी तूर्तास बोलण्यास नकार दिला आहे. तर रोहिणी खडसेंशी संपर्क होऊ शकलेला नाही. या प्रकरणात सुरुवातीला प्रांजल खेवलकरांच्या बचावासाठी न्यायालयात येणाऱ्या रोहिणी खडसे खेवलकरांच्या मोबाईलमधील गोष्टी उघड होऊ लागल्यावर मात्र रोहिणी खडसे बचावासाठी पुढे आलेल्या नाहीत.
पोलिसांनी खेवकरसह सहा जणांना अटक केली
पुणे पोलिसांनी २६ जुलैच्या मध्यरात्री खराडी भागात एका फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या पार्टीवर धाड टाकली असता तिथं दोन ग्राम पेक्षा थोडंसं अधिक कोकेन आणि काही ग्राम गांजा आढळून आला होता. त्याआधारे पोलिसांनी खेवकरसह सहा जणांना अटक केली होती . मात्र एक महिना उलटून गेल्यानंतर देखील अटक केलेल्या आरोपींपैकी कोणी अमली पदार्थांचं सेवन कोणी केलं होतं का याबाबतचा न्यायवैद्यकीय प्रयोग शाळेचा अहवाल अद्याप आलेला नाही. दुसरीकडे खेवलकरांच्या खाजगी आयुष्यातील गोष्टी उघड होत गेल्याने हे प्रकरण चर्चेत ठेवण्याचा उद्देश सफल होताना दिसतोय.
अटक केलेल्या सहा आरोपींपैकी कोणी अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं का? याचं उत्तर पुणे पोलिसांनी एका महिन्यानंतर देखील दिलेलं नाही. दुसरीकडे तपासात भलत्याच गोष्टी उघड होत गेल्याने खेवलकरांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलंय. ज्यामुळं रोहिणी खडसेंची कोंडी झाली आहे. त्यांच्या वैवाहिक आयुष्याची त्यामुळं जाहीर चर्चा होतेय. पण हे प्रकरण ज्यावर उभा राहिलंय त्या अंमली पदार्थांचं सेवनाबद्दल उत्तर मिळत नसल्याने पुणे पोलिसांच्या सचोटीबद्दल देखील अनेक प्रश्न उभे ठाकलेत.
आणखी वाचा
Comments are closed.