तीन वर्षापूर्वी पतीचे निधन, विधवा महिलेने जीन्स घातली म्हणून दीरासह सासूने… पुण्यात धक्कादायक

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका ३३ वर्षीय विधवा महिलेने जीन्स घातल्याच्या रागातून सासू, दीर, आणि मुलीने तिला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना सहकारनगर (Pune Crime News) भागात घडली आहे. या मारहाणीत महिलेचा हात (Pune Crime News) मोडला, त्याचबरोबर ती महिला गंभीर जखमी झाली तिला उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडितेच्या तक्रारीवरून सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune Crime News)

या घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार महिला ही कचरावेचक आहे, ती महिला चार मुलांसह तळजाई वसाहत परिसरात वास्तव्यास आहे. महिलेल्या पतीचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. तक्रारदार महिला ३० डिसेंबरला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जीन्स घालून घराबाहेर थांबली होती. त्या वेळी त्यांची सासू सविता तेथे आली आणि जीन्स घातली या रागातून सासूने सुनेचे केस ओढून मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याचवेळी सासूने तिच्या चारित्र्यावरही संशय घेतला.(Pune Crime News)

सासू मारहाण करत असताना पीडितेने आरडाओरडा केल्यानंतर पिडीत महिलेची मोठी मुलगी घटनास्थळी आली. तिने आईला होणारी मारहाण थांबवण्याऐवजी ती तिच्या आजीसोबत आईला मारहाण करू लागली. पीडितेच्या दिराने तिचा डावा हात पिरगळला. या मारहाणीत महिलेचे मनगटाजवळील हाड मोडलं. पीडितेच्या मुलांनाही मारहाण करण्यात आली. आरोपींनी महिलेचा मोबाइलही काढून घेतला. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी मारहाण, शिवीगाळ आणि गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संबंधित महिलेला ससून रुग्णालयात नेऊन तिची वैद्यकीय तपासणी केली असता मनगटाचे हाड फॅक्चर झाल्याचे समोर आले आहे.

या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे, तर महिलेबाबत हळहळ व्यक्त होत आहे, पतीच्या मृत्यूनंतर महिलांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर होणाऱ्या हिंसाचाराचा हा गंभीर प्रकार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांकडून आरोपी सासू, दीर आणि मुलीविरोधात भारतीय न्याय संहितेअंतर्गत संबंधित कलमे लावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

आणखी वाचा

Comments are closed.