मनोज जरांगेंना आझाद मैदानात आंदोलन करण्यास परवानगी, मुंबई पोलिसांनी कोणत्या अटी अन् नियम ठेवले

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना 29 ऑगस्ट 2025 ला मुंबईतील आझाद मैदानात नियम आणि अटींसह आंदोलन करण्यास आझाद मैदान पोलीस स्टेशनकडून परवानगी देण्यात आली आहे. मनोज जरांगेंना मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करताना मुंबई पोलिसांनी कोणत्या अटी ठेवल्या आहेत. ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

मुंबईतील आझाद मैदान पोलीस स्टेशननं मनोज जरांगे यांना 5000 आंदोलकांसह 29 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेतपर्यंत आंदोलन करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

आझाद मैदान पोलीस स्टेशननं ठेवलेले नियम कोणते?

1)  आंदोलनास एका वेळी फक्त एका दिवसासाठी परवानगी देण्यात येईल. शनिवार, रविवार व शासकीय किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कोणत्याही परवानग्या देण्यात येणार नाहीत.’

2) ठराविक वाहनांनाच परवानगी असेल. वाहनांची पार्किंग व्यवस्था पोलीसांच्या सल्ल्याने करावी लागेल. आंदोलकांची वाहने ईस्टर्न फ्रीवेवरून वाडीबंदरपर्यंत येतील. त्यानंतर मुख्य नेत्यासोबत फक्त 5 गाड्यांना आझाद मैदानात प्रवेश मिळेल. बाकीच्या गाड्या पोलिसांनी सांगितलेल्या ठिकाणी पार्क कराव्या लागतील.

3) आंदोलनात जास्तीत जास्त पाच हजार लोकच सहभागी होऊ शकतात. आझाद मैदानासाठी सात हजार चौ. मीटर जागा राखीव असून ती इतक्या लोकांनाच सामावून घेऊ शकते. त्याच दिवशी इतर आंदोलकांनाही परवानगी दिली असल्याने त्यांचा हक्क अबाधित राहील.

4) आंदोलनाच्या वेळी मोर्चा काढता येणार नाही.

5)  परवानगी घेतल्याशिवाय ध्वनीक्षेपक, सार्वजनिक प्रचार यंत्रणा किंवा गोंगाट करणारी उपकरणे यांचा वापर करता येणार नाही.

6)  आंदोलनाची वेळ सकाळी 9.00 ते सायंकाळी 6.00 याच वेळेसाठी दिलेली असून त्यानंतर आंदोलकांना मैदानात थांबता येणार नाही.

7) आंदोलनाच्या जागेत स्वयंपाक करणे, कचरा टाकणे पूर्णपणे बंदी आहे.

8) आंदोलनाच्या काळात गणेशोत्सव सुरू असल्याने वाहतुकीला अडथळा, नागरिकांना त्रास किंवा धार्मिक भावना दुखावणारे वर्तन करता येणार नाही. आंदोलनात लहान मुले, गरोदर स्त्रिया आणि वृद्धांना सहभागी करू नये.

दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी देताना ज्या अटी घातल्या आहेत त्या मान्य आहेत. मात्र, एका दिवसाची अट मान्य नाही.  एक दिवस आंदोलनाला परवानगी देणार असाल तर एका दिवसात मागण्या मान्य करा. आम्हाला ज्या अटी घालण्यात आल्या आहेत. त्याचं पालन करेल. आज शिवनेरी येथे पोहोचल्यानंतर मुंबई पोलिसांनी परवानगी देताना घातलेल्या अटींबद्दल माहिती घेऊ, याबाबत कोर्टात देखील जाण्याबाबत विचार करु, असं मनोज जरांगे म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=pmmom_ytgnq

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.