धक्कादायक! नागपूरात 16 वर्षीय विद्यार्थिनीची हत्या; शाळेतून घरी परतताना हल्ला, आरोपी फरार
नागपूर : शहरात एका शाळकरी (School) मुलीची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून चक्क शाळेतून घरी जात असताना तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलमोहर कॉलनीत एका 16 वर्षीय विद्यार्थिनीची निर्घृणपणे हत्या झाली आहे. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांना असून मृत मुलगी दहाव्या वर्गात शिक्षण घेत असल्याचे समोर आलं आहे. या घटनेनं नागपूर शहर हादरलं असून शाळेतील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे राज्याच्या गृहमंत्र्यांच्या नागपूर (Nagpur) जिल्ह्यातच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
हत्या झालेली विद्यार्थीनी अजनी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या शाळेतील विद्यार्थिनी आहे. शाळेतून घरी परत जाण्यास निघाली असताना एका अल्पवयीन आरोपीने तिची वाट अडवली. त्यानंतर, कुणाला काही कळण्यापूर्वीच आरोपीने मुलीवर चाकूने सपासप वार केले, ज्यामध्ये ती रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळली. हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अजनी पोलीस ठाण्याचे निरीक्षक, पोलीस कर्मचारी व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मुलीवर चाकूने वार केल्यानंतर आरोपी लगेचच घटनास्थळावरून पसार झालेला होता. आरोपी हा अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांची अनेक पथकं रवाना झाली आहेत. मात्र, या हत्याकांडाने नागपूर शहर हादरलं आहे.
हत्या करण्यापूर्वी आरोपीने संबंधित विद्यार्थीनीला फोन केल्याची माहिती पुढे आली आहे. शाळा सुटल्यानंतर ती मुलगी घरी जात असताना आरोपीने तिला वाटेतच गाठले. काही समजण्यापूर्वी आरोपीने तिच्यावर चाकूने वार केले, या घटनेबाबत पोलिसांनी सध्या तरी कोणतीही माहिती दिली नसून अधिकची प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र, पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे.
हेही वाचा
भाजप आमदाराचे विधानसभा अध्यक्षांना पत्र; मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा
आणखी वाचा
Comments are closed.