मतचोरीच्या काँग्रेसच्या आरोपांना आता नक्षलवाद्यांचाही पाठिंबा; पत्रकातून मोदींसह भाजपवर आरोप
नॅक्सलाइट्स नवीन पत्र: मतचोरी संदर्भातील काँग्रेसच्या आरोपांना आता नक्षलवाद्यांचा ही पाठिंबा मिळाला असल्याचे चित्र आहे. नक्षलवाद्यांच्या सर्वोच्च डिसीजन मेकिंग बॉडी मानल्या जाणाऱ्या ‘सेंट्रल कमिटी’ने नुकतंच काढलेल्या पत्रकात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपवर मतचोरी करून सत्ता मिळवण्याचा गंभीर आरोप केला आहे. नक्षलवाद्यांनी मतचोरीचा आरोप करणाऱ्या राजकीय पक्षांच्या एक पाऊल पुढे जात मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच्या काळापासून मतचोरी करून विधानसभा आणि इतर निवडणुका जिंकत आल्याचा आरोप नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटीने केला आहे.
काँग्रेससह विरोधी पक्षांनी मतचोरीचा मुद्दा समोर आणण्यास खूप उशीर लावला
दरम्यानमोदी आणि भाजपने त्याच पद्धतीने 2024च्या लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवण्याचा आरोप ही नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटीने केला आहे. तरदेशात वोट चोरीचा खेळ अनेक वर्षांपासून सुरू असून काँग्रेस पक्षाने तो जनतेसमोर आणण्यामध्ये खूप उशीर लावल्याचे ही नक्षलवाद्यांचे म्हणणे आहे. मात्र, काँग्रेससह विरोधी पक्षांनी मतचोरीचा मुद्दा उचलून धरल्यापासून संसदीय लोकशाहीची पोलखोल पुन्हा एकदा झाली असून त्या विरोधात जनआंदोलन करण्याची गरज असल्याचे नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटीने सुचवले आहे.
अमेरिकेच्या टेरीफ विरोधात मोदी सरकारने केलेला आत्मनिर्भरतेचा दावाही थोतांड
नक्षलवाद्यांच्या या 11 पानी पत्रकात अमेरिका आणि ट्रम्प प्रशासनकडून विविध देशांवर लादण्यात आलेल्या टेरिफचाही चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. अमेरिका कमकुवत देशांवर टेरिफ लावून स्वतःची अर्थव्यवस्था वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर चीन सारखे कम्युनिस्ट शासन असलेले तर रुस सारखे पूर्वश्रमीचे कम्युनिस्ट देश अमेरिकेच्या टेरीफच्या खेळाचा वेगळ्या पद्धतीने फायदा उचलत आहे. चीन आणि रुस अमेरिकेकडून टेरिफ लादण्यात आलेल्या देशांसोबत समझोते करून आपला फायदा करून घेत असल्याचा आरोपही नक्षलवाद्यांच्या या पत्रकातून करण्यात आला आहे. अमेरिकेच्या टेरीफ विरोधात मोदी सरकारने केलेला आत्मनिर्भरतेचा दावाही थोतांड असून भारत अमेरिकेच्या उत्पादनांवर कुठलाही शुल्क लादू शकत नाही आहे. यावरूनच अमेरिकेपुढे भारत आणि मोदी सरकारची हतबलता आणि भित्रेपणा दिसून येत असल्याचे आरोप ही पत्रकातून करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.