टाटांच्या आणखी एका कंपनीचा आयपीओ येणार, 17 हजार कोटींच्या IPO ची गुंतवणूकदारांना प्रतीक्षा
टाटा कॅप्टियल आयपीओ मुंबई : टाटा कॅपिटल कंपनीकडून 17000 कोटी रुपयांचा आयपीओ आणणार आहे. त्यासंदर्भातील तयारी सुरु आहे. आयपीओद्वारे वर्ल्ड बँक ग्रुपची शाखा इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन त्यांची भागीदारी विकून पैसे कमावणार आहे. आयएफसी टाटा कॅपिटलमधील 3.58 कोटी शेअर ऑफर फॉर सेलद्वारे विकणार आहे. 2011 मध्ये टाटा कॅपिटलच्या क्लीनटेकया कंपनीत आयएफसीनं गुंतवणूक केली होती.
टाटा कॅपिटलला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं शेअर बाजारात लिस्ट होण्यास यापूर्वी सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. आता ती ऑक्टोबरच्या पहिल्या आठवढ्यापर्यंत वाढवण्यात आली आहे. कंपनी यामुळं आयपीओ लवकरात लवकर लाँच करु शकते. हा आयपीओ यशस्वी झाल्यास भारतीय वित्तीय क्षेत्रातील सर्वात मोठा आयपीओ ठरेल.
आयएफसीनं 2011 मध्ये टाटा कॅपिटलच्या साथीनं क्लीनटेक कॅपिटल लिमिटेड कंपनी सुरु केली होती. त्यावेळी भारतात सौर, पवनस बायोमास, छोटे जलविद्युत प्रकल्प यासारख्या क्लीन एनर्जी क्षेत्र अनुदानावर अवलंबून होतं.त्यावेळी टाटा क्लीनटेक कॅपिटलनं या क्षेत्रात मोठं काम केलं. कंपनीनं 500 हून अधिक जादा नवीकरणीयक्षम ऊर्जा प्रकल्पांना वित्तपुरवठा केला. यामध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जविद्युत आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी सारखे प्रकल्प होते.
आर्थिक वर्ष 2025 पर्यंत टीसीसीएलच्या क्लीनटेक आणि इन्फ्रास्टक्रचर लोन बुकनं 18000 कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या दोन वर्षात 32 टक्के वाढ झाली आहे. त्यानंतर टाटा क्लीनटेक कॅपिटल लिमिटेडचं टाटा कॅपिटलमध्ये विलीनीकरण करण्यात आलं. सध्या आयएफसीकडे टाटा कॅपिटलमध्ये 7.16 कोटी शेअर आहेत. त्यापैकी 3.58 कोटी शेअर आयपीओच्या माध्यमातून विकले जाणार आहेत.
इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनने टाटा कॅपिटलमध्ये 25 रुपये प्रति शेअर प्रमाणं गुंतवणूक केली होती. त्यावेळी त्याचं मूल्य 179 कोटी रुपये होतं. आता राईटस इश्यूच्या आधारावर शेअरची किंमत 343 रुपये होत असून त्यांच्या भागीदाची मूल्य 2458 कोटी रुपये झालं आहे. म्हणजेच आयएफसीला 2278 कोटी रुपयांचा नफा होणार आहे. हा तब्बल 13 पट परतावा आहे. जाणकारांच्या मते आयपीएची किंमत यापेक्षा अधिक असू शकते त्यातून आयएफसीचा नफा वाढू शकतो.
टाटा कॅपिटल आयपीओच्या माध्यमातून 21 कोटी नवे शेअर जारी करेल याशिवाय 26.58 कोटी शेअरची ऑफर फॉर सेलद्वारे विक्री होईल. यापैकी 23 कोटी शेअर टाटा सन्सचे असतील तर 3.58 कोटी शेअर आयएफसीचे असतील. टाटा सन्सची टाटा कॅपिटलमध्ये 88.6 टक्के भागिदारी आहे. नव्या शेअर विक्रीतून मिळणारी रक्कम टियर -1 कॅपिटल वाढवण्यासाठी आणि कर्ज वितरण उद्योग वाढवण्यासाठी वापरले जातील.
टाटा ग्रुपचा हा गेल्या काही वर्षातील मोठा आयपीओ असेल. नोव्हेंबर 2023 मध्ये टाटा टेक्नोलॉजीजचा आयपीओ आला होता.आरबीआयकडून मोठ्या एनबीएफसीला तीन वर्षात शेअर बाजारात लिस्ट होणं आवश्यक आहे, असं सांगण्यात आलं होतं.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा
Comments are closed.