शरद पवार म्हणजे कारस्थानाचा कारखाना, आधुनिक काळातील नारदमुनी; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल
गोपीचंद पडलकर आणि शरद पवार: शरद पवार हे कारस्थानाचा कारखाना आहेत. कारस्थान कसे रचायचे, हे शरद पवारांकडे (Sharad Pawar) पाहून शिकता येईल. मारकडवाडी प्रकरणात त्यांनी देशाच्या निवडणूक आयोगावर (Election Commission) शंका निर्माण करण्याचे काम केले. ज्या शरद पवारांनी दिशाभूल करून निवडणूक आयोगासारख्या विश्वासार्ह संस्थेवर शंका निर्माण करायला लावले, त्यांच्यावर निवडणूक आयोगाची बदनामी केली म्हणून गुन्हा निर्माण केला पाहिजे. निवडणूक हा देशाचा गाभा आहे, त्यावर षडयंत्र करून शंका घेण्यास भाग पाडणे म्हणजे देशद्रोह आहे. त्यामुळे शरद पवारांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला पाहिजे, अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली. ते बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवार, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
शरद पवार हा आधुनिक काळातील नारदमुनी आहे. एकीकडे मंडल यात्रा, दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून नातू आंदोलन करतो. ही भूमिका दुतोंडी आहे. तुम्ही षडयंत्र करून एखादा यंत्रणेबाबत साशंकता निर्माण करता. चिठ्ठ्या गिळता येतात, पळवता येतात. त्यामुळे सहकार क्षेत्रात शरद पवार यांचे प्राबल्य आहे. सहकारात जर ईव्हीएम आले तर यांचे प्राबल्य संपून जाईल. निवडणूक हा देशाचा गाभा आहे, त्यावर षडयंत्र करून शंका घेण्यास भाग पाडणे म्हणजे देशद्रोह आहे. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला पाहिजे, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली.
शरद पवार यांनी स्वत: सांगितले की, त्यांच्याकडे दोन लोक आले होते. त्यांनी विधानसभा निवडणुकीत 160 आमदार निवडून आणण्याची ऑफर दिली. त्यांनी तात्काळ गृहमंत्र्यांना फोन करून सांगितले पाहिजे होते. पण शरद पवार यांनी हा प्लॅन राहुल गांधी यांना सांगितला. निवडणूक झाल्यावर आठ महिन्यांनी त्यांनी ही गोष्ट त्यांनी सांगितली. तुम्ही पोलिसांऐवजी राहुल गांधींकडे त्यांना घेऊन गेला म्हणजे हे षडयंत्र आहे ना, असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला. तसेच आता ते लोक कोण होते, हे आठवत नाही, असे शरद पवार सांगतात. शरद पवारांना 50 वर्षांपूर्वी भेटलेले लोक आणि गोष्टी आठवतात. मग आठ महिन्यांपूर्वी भेटायला आलेले दोन लोक त्यांना आठवत नाहीत का, असा सवालही गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला.
Gopichand Padalkar on Meenatai Thackeray statue: मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकला, पडळकर म्हणाले…
मुंबईच्या दादर परिसरात असणाऱ्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर एका अज्ञात व्यक्तीने लाल रंग फेकला. यावरुन दादर परिसरात तणाव निर्माण झाला, शिवसैनिक आक्रमक झाले होते. या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी म्हटले की, माँ साहेब आमच्या श्रद्धास्थानी आहेत. त्यांच्या पुतळ्यावर रंग फेकणे, योग्य नाही. पोलीस याप्रकरणात योग्य ती कारवाई करतील, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.