भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलाचं मोठं कांड, नदीत कार फेकून मृत्यूचा बनाव रचला अन्…

शिर्डी क्राइम न्यूज: एका भाजप (BJP) नेत्याच्या मुलाने स्वतःच्या अपघाती मृत्यूचा बनाव रचून कोट्यवधींच्या कर्जातून सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारावर हा नाटकी कट उघडकीस आणला असून, संबंधित युवकाला महाराष्ट्रात शिर्डी आणि शनी शिंगणापूरमध्ये फिरताना अटक करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

ही घटना ५ सप्टेंबर रोजी घडली. पहाटेच्या सुमारास राजगढ पोलिसांना कालीसिंध नदीत कार पडल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मच्छिमारांच्या मदतीने कार नदीतून बाहेर काढली. मात्र, गाडीत कोणीही आढळले नाही. कारची ओळख पटल्यावर समजले की ती कार भाजप नेते महेश सोनी यांचा मुलगा विशाल सोनी याची आहे. विशाल त्याचवेळी बेपत्ता होता.

शोधमोहीम सुरू; मृतदेह सापडला नाही

विशाल बेपत्ता झाल्यानंतर एसडीईआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. 20 किमीच्या परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली, मात्र दहा दिवस उलटूनही कोणताही मृतदेह सापडला नाही. यामुळे पोलिसांच्या संशयास पुष्टी मिळाली. विशालच्या वडिलांनीही शोधामध्ये पुरेसे सहकार्य केले नाही, अशी चर्चा झाली होती. त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा तांत्रिक बाजूंवर केंद्रित केली.

कॉल डिटेल्सने केला पर्दाफाश

विशालच्या मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) च्या तपासणीतून पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. विशालचं लोकेशन महाराष्ट्रात असल्याचे स्पष्ट झाले. संभाजीनगर जिल्ह्यातील फर्दापूर पोलीस स्टेशनच्या मदतीने विशालला ताब्यात घेण्यात आले.

कर्जातून सुटण्यासाठी बनाव रचला

पोलिस चौकशीत विशालने कबुली दिली की, त्याच्यावर 1 कोटी 40 लाखांपेक्षा अधिक कर्ज होते. त्याच्याकडे सहा ट्रक आणि दोन प्रवासी वाहने असून, आर्थिक अडचणीमुळे तो कर्ज फेडू शकत नव्हता. कुटुंबातील काही सदस्यांनी “मृत्यू प्रमाणपत्र मिळाल्यास कर्ज माफ होईल”, असा सल्ला दिला होता. त्यातूनच त्याने मृत्यूचा बनाव करण्याचा कट रचला.

बनावाचा थरार : नदीत कार ढकलली आणि पळून गेला

विशालने पोलिसांना सांगितले की, 5 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजता, तो इंदूर रोडवरील गोपाळपुरा परिसरात एका ढाब्यावर उभ्या असलेल्या आपल्या ट्रकमधून भाडे घेऊन आला. त्यानंतर तो आपल्या कारमध्ये बसून नदीकाठ गेला, गाडीचे हेडलाइट बंद केले, आणि चालत असलेल्या कारला नदीत ढकलले. पूलावर पॅरापेट नसल्यानं कार थेट नदीत गेली. यानंतर तो एका ड्रायव्हरच्या बाईकवरून परत ढाब्यावर आला आणि लगेचच इंदूरला जाणाऱ्या बसमध्ये बसून निघून गेला.

मृत्यूची बातमी वाचून महाराष्ट्रात पलायन

दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांमध्ये स्वतःच्या ‘मृत्यू’ची बातमी वाचल्यावर विशालने महाराष्ट्रात पलायन केले. तो काही दिवस शिर्डी आणि शनी शिंगणापूर परिसरात फिरत होता. मात्र पोलिसांचा तपास त्याच्या मागे लागल्याचे समजताच, त्याने नवीन नाटक रचण्याचा प्रयत्न केला.

अपहरणाची बनावट कथा

तपास चुकवण्यासाठी विशालने स्वतःचे कपडे फाडले, धुळीत लोळला, आणि अपहरण झाल्याचा बनाव करत फर्दापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी आधीच पूर्ण माहिती गोळा केली होती आणि काही क्षणांतच त्याचा कट उघडकीस आला.

गुन्हा दाखल नाही?

या प्रकरणात सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, विशाल सोनीने मृत्यूचा बनाव, पोलिस यंत्रणेला चुकीची माहिती, आणि गुन्हेगारी कट रचून देखील त्याच्यावर अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Pune Crime Firing: मानेत अन् मांडीत गोळी लागताच रक्ताची धार लागली, प्रकाश धुमाळ इमारतीच्या पाण्याच्या टाकीवर लपले, शेवटच्या घटकेला पाणी पाजणारा म्हणाला…

आणखी वाचा

Comments are closed.