महापालिका निवडणुकीआधीच मित्रपक्षात पडली ठिणगी; शिवसेना शिंदे गट-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, 3
कल्याण: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सोमवारी रात्री शहाड परिसरात भाजप (BJP) आणि शिवसेना शिंदे (Shivsena Shinde Group) गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीनं तणाव वाढला आहे. या मारामारीत 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छांचा बॅनर भाजपच्या फ्रेमवर लावल्यामुळे वाद उफाळला. या प्रकरणावरून भाजपचे वॉर्ड अध्यक्ष मोहन कोणकर आणि शिंदे गटाचे माजी नगरसेवक गणेश कोट यांचा मुलगा मुकेश कोट यांच्यात जोरदार वाद झाला. वाद वाढत गेला आणि अखेर परिस्थिती हाताबाहेर गेली आणि ती राड्यापर्यंत पोहोचली. यात मोहन कोणकर, मुकेश कोट आणि आणखी एका कार्यकर्त्याला मारहाण होऊन ते जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात परस्परविरोधी गुन्हे नोंदवले आहेत.
स्थानिक राजकारणात भाजप आणि शिंदे गट युतीत असले तरी त्यांच्यातील मतभेद वारंवार उफाळून येतात. याआधीही दोन वर्षांपूर्वी माजी आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यात वाद पेटला होता. पोलिस ठाण्यातच झालेल्या राड्याच्या वेळी गोळीबारही झाला होता. या पार्श्वभूमीवर शहाड येथील सोमवारी झालेली हाणामारी निवडणुकीच्या तोंडावर वातावरण आणखी तापवणारी ठरत आहे.
याबाबत मोहन कोनकरांनी माहिती देताना म्हटलं..
मोहन कोनकर यांनी याबाबत सांगितलं की, माझ्या घराजवळ माझे बॅनर लावलेले असतात, तिथे लावण्यासाठी मी एक बॅनर आणलेला होता. तो उद्या लावणार होतो. मी मागच्यावेळी त्यांची फ्रेम लावली होती. त्यांचा बॅनर लावलेला होता. आता पुन्हा याने तेच केलं. माझ्या बॅनरवरती त्यांनी बॅनर लावायला घेतला. त्यांनी साईडला लावायला हवा होता. बॅनरवाल्याने गणेश यांना फोन केला. त्यानंतर तो आला आणि आमच्यावर हात उचलायला लागला. तुमची जागा आहे का असं बोलायला लागला. पाईपने मारायला लागला. मग चार-पाच जणांनी त्याला मारलं. आम्ही देखील याबाबत तक्रार करण्यासाठी आलो आहे. गणेश कोट माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटाचा आहे. तो दादागिरी करतो, लोकांना त्रास देतो, असंही भाजपचे महेश कोनकर म्हणालेत.
लेव्हल मुकेश कोट एकनाथ शिंदे गटाचे यांनी या घटनेबाबत बोलताना सांगितलं, आमचा बॅनर लावायला रेल्वेच्या कंपाऊंडला एक मुलगा गेला होता. तिथे मोहन कोनकर म्हणून भाजपचा कार्यकर्ता आहे, त्यांनी तो बॅनर तिथे लावू दिला नाही. तो म्हणाला तिथे माझे बॅनर लागतात. इथं तुम्ही बॅनर लावायचे नाहीत. तुम्हाला लावायचे असतील तर दुसरीकडे लावा असं ते म्हणत होते. त्यानंतर त्यांनी मला फोन केला मी जागेवर पोहचलो, तर त्यांनी मला तसंच बोलायला लागले. त्यानंतर त्याच्यासोबत जे होते ते थोडे पिलेले होते. त्यांनी माझ्यावर अटॅक केला, चार-पाच जण होते. त्यांनी मारायला सुरुवात केली, बॅनरवरून हे सर्व झालं आहे, पोलीस तक्रार दिली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.