पडक्या घरावरून सोने अन् पैशांनी गच्च भरलेली दरोडेखोरांची बॅग जप्त; चडचण बँक दरोड्यातील मुद्देमा
मंगळवेढा : कर्नाटकातील चडचण बँक 21 कोटीच्या दरोडा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील चडचण येथील स्टेट बँकेवर झालेल्या दरोड्यानंतर मंगळवेढा (chadchan Bank Robbery) पोलिसांना एक महत्त्वाचा धागा लागला आहे. मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गावातील एका पडक्या घरातून सोन्याचे दागिने व रोकड असलेली संशयास्पद बॅग सापडली आहे. स्थानिक नागरिकांनी गावातील पडक्या घरात बॅग पडलेली दिसल्याने संशय व्यक्त करत पोलिसांना माहिती दिली. (chadchan Bank Robbery)
या माहितीच्या आधारे डीवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे आणि कर्नाटक पोलिस अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचासमक्ष बॅग उघडून पाहिली असता त्यात मोठ्या प्रमाणावर सोने आणि रोकड आढळून आली. या बॅगेतील रक्कम आणि सोन्याचे नेमके मोजमाप जाहीर करण्यात आलेले नसले तरी या दरोड्यातील बहुतांश माल सापडल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. पंचनामा करून ती बॅग कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली.
मंगळवारी संध्याकाळी चडचण येथील बँकेत बुरखाधारी दरोडेखोरांनी थरार माजवत तब्बल २० किलो सोने व एक कोटी रुपयांची रोकड लंपास केली होती. पळून जाण्यासाठी त्यांनी बनावट नंबर प्लेटची कार वापरली होती. हुलजंती गावाजवळ दुचाकी अपघातानंतर स्थानिक तरुणांनी दरोडेखोरांचा पाठलाग केला असता त्यांनी गाडी सोडून पळ काढला. त्यानंतर महाराष्ट्र व कर्नाटक पोलिसांनी रात्रभर शोधमोहीम राबवली, मात्र आरोपींचा मागमूस लागला नव्हता.
सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलिसांची संयुक्त पथके या दरोड्याचा तपास करत आहेत. हुलजंती गावात सापडलेली बॅग दरोडेखोरांनी पळ काढताना गडबडीत टाकून दिली की ती त्यांनी जाणूनबुजून गुप्त ठिकाणी ठेवली, यावर तर्कवितर्क रंगले आहेत. या तपासामुळे दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संयुक्त पथकाकडून तपास
कर्नाटक व महाराष्ट्र पोलिसांची संयुक्त पथके आरोपींचा तपास करत आहेत. गुरुवारी दुपारी पोलिसांना खबर मिळताच पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांनी हुलजंती येथील त्या पडक्या घरातील सोने व पैशाची बॅग जप्त करून कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन केली. मात्र दरोडेखोरांनी कोट्यवधींचा माल लुटून पळताना ही बॅग टाकून दिली की जाणीवपूर्वक गुप्त ठिकाणी ठेवली, यावर तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
मॅनेजरला धमकावून ऐवज काढून घेऊन पोबारा
दरोडेखोरांनी बँकेत घुसताच “पैसे बाहेर काढ, नाहीतर जीवे मारू,” असे बँक मॅनेजरला धमकावलं. नंतर त्यांनी कॅश व्हॉल्ट आणि सोन्याचे लॉकर उघडायला लावलं. ग्राहकांनी जमा केलेले दागिने आणि बँकेतील रोकड पिशव्यांमध्ये भरून त्यांनी पळ काढला. दरोडेखोरांनी सैनिकी गणवेशासारखे कपडे परिधान करून बँकेत प्रवेश केला होता. त्यांच्या हातात गावठी पिस्तुलं आणि धारदार शस्त्रं होती. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ते थेट बँकेत घुसले आणि कर्मचाऱ्यांना धमकावत त्यांच्या हातापायांना प्लास्टिकच्या दोऱ्यांनी घट्ट बांधले. बँक मॅनेजरसह इतर कर्मचाऱ्यांना शौचालयात कोंडून ठेवले, तर बँकेत उपस्थित ग्राहकांनाही ओलीस बनवण्यात आले.
आणखी वाचा
Comments are closed.