त्र्यंबकेश्वरमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर हल्ला; छगन भुजबळांकडून तीव्र निषेध, दोषी
नाशिक गुन्हा: नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar) आज शनिवारी (दि. 20) एक धक्कादायक प्रकार घडला असून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना काही गुंडांनी बेदम मारहाण केली आहे. या हल्ल्यात तीन ते चार पत्रकार गंभीर जखमी झाले असून, सध्या त्र्यंबकेश्वरच्या शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ही घटना स्वामी समर्थ केंद्राजवळील कमानी परिसरात घडली. येथे गाड्यांच्या प्रवेशासाठी पावती घेणाऱ्या काही व्यक्तींनी, पत्रकारांवर अचानक हल्ला केला. पत्रकार वार्तांकनासाठी त्र्यंबकेश्वरला गेले असता संबंधित गुंडांकडून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.
पत्रकार गंभीर जखमी
हल्ल्यात तीन ते चार पत्रकार जखमी झाले असून, त्यांना तात्काळ त्र्यंबकेश्वरच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, एक पत्रकार गंभीर अवस्थेत असून त्याला पुढील उपचारासाठी नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु
घटनेनंतर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून काय कारवाई होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकरणाचा पत्रकार संघटनांकडून निषेध व्यक्त केला जात असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
छगन भुजबळांकडून निषेध
दरम्यान, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणाचा निषेध नोंदवला आहे. तर नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी पोहचत जखमी पत्रकाराच्या तब्येतीची विचारपूस केली. दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना छगन भुजबळ यांनी पत्रकारांना दिल्या आहेत. तसेच जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे देखील आज रात्री नाशिकमध्ये दाखल होणार असून ते जखमी पत्रकारांची भेट घेणार आहेत.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.