ओला दुष्काळ जाहीर करा, कॅबिनेटमध्ये शिवसेनेचे सर्व मंत्री एकमुखाने मागणी करणार!


ओले दुष्काळ महाराष्ट्र: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rains) संपूर्ण राज्यात जनजीवन विस्कळीत झाले असून, शेती, जनावरं आणि घरे यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः विदर्भ (vidarbha), मराठवाडा (Marathwada) आणि उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) जिल्ह्यांमध्ये पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज (23 सप्टेंबर) होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) ‘ओला दुष्काळ’ (Wet Drought Maharashtra) जाहीर करण्याची जोरदार मागणी होणार आहे.

शिवसेना मंत्री करणार एकमुखाने मागणी

शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले की, “मराठवाड्याप्रमाणेच जळगाव जिल्ह्यातही अतिवृष्टी झाली आहे. अनेक तालुक्यांत ढगफुटी सदृश परिस्थिती असून, शेती पिकांचे आणि जनावरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. संपूर्ण जळगाव जिल्ह्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्यात यावा, अशी आम्ही आजच्या कॅबिनेट बैठकीत मागणी करणार आहोत.” पाटील पुढे म्हणाले की, “निधीच्या वाटपासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे. आगामी पाच दिवसांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याने सर्वांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत,” असे त्यांनी सांगितले.

काँग्रेसची देखील तीव्र मागणी

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, “राज्यात इतके मोठं नुकसान झालं असताना अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्री अद्यापही प्रत्यक्ष पाहणीस गेलेले नाहीत. नुकसानग्रस्त भागांत पंचनामे सुरू झालेले नाहीत, ही बाब अत्यंत गंभीर आहे.” वडेट्टीवार यांनी मागणी केली की, “आजच्या बैठकीत सर्व मंत्र्यांना आपल्या जिल्ह्यात जाऊन परिस्थितीची पाहणी करण्याचे आदेश देण्यात यावेत. पावसाचा जोर वाढण्याची शक्यता लक्षात घेता, नागरिकांना त्वरित सुरक्षित ठिकाणी हलवण्याची गरज आहे. तसेच, राज्य सरकारने त्वरीत ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा द्यावा,” असे त्यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारपुढे आव्हान

संपूर्ण राज्यात निर्माण झालेल्या या नैसर्गिक संकटाचा आढावा घेऊन राज्य सरकारने तातडीने निर्णय घेणे गरजेचे झाले आहे. शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान भरून निघण्यासाठी आर्थिक मदतीसह इतर उपाययोजनांची गरज आहे. त्यामुळे आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सरकार ‘ओला दुष्काळ’ जाहीर करते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=SLR6RHJNAYM

आणखी वाचा

Sharad Pawar on Farmers: शरद पवारांनी अतिवृष्टीची भीषणता अधोरेखित केली, शेतकऱ्यांना फक्त पीकांसाठी नव्हे तर ‘या’ तीन गोष्टींसाठी नुकसानभरपाईची केली मागणी

आणखी वाचा

Comments are closed.