मुंबई संघात मोठा बदल, नवीन कर्णधाराची घोषणा; यशस्वी जैस्वाल बाहेर, रहाणे अन् सरफराजची एन्ट्री


मुंबई रणजी ट्रॉफी 2025-26 पथक अद्यतनः मुंबई क्रिकेट संघाच्या वरिष्ठ निवड समितीने आगामी 2025-26 रणजी हंगामासाठी 24 सदस्यीय संभाव्य खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. स्टार ऑलराउंडर शार्दुल ठाकूर याला संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. गेल्या हंगामात मुंबईचे नेतृत्व करणारा अजिंक्य रहाणेही संघात आहे, मात्र या वेळेस तो केवळ फलंदाज म्हणून निवडला गेला आहे. विशेष म्हणजे, टीम इंडियाचा स्टार सलामीवीर यशस्वी जैस्वालला या यादीत स्थान मिळालेले नाही.

स्टार खेळाडू श्रेयस अय्यरही या यादीत नाही, कारण त्याने सध्या लाल चेंडूच्या क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. अय्यरने बीसीसीआयला काही काळासाठी रेड-बॉल क्रिकेटमधून विश्रांती देण्याची विनंती केली आहे. त्यामुळेच वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी त्याचे नाव चर्चेत आले नाही.

शार्दुल ठाकूरवर मोठी जबाबदारी

आगामी रणजी हंगामात शार्दुल ठाकूर मुंबईचे नेतृत्व करताना दिसणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो टीम इंडियाचा भाग होता, पण त्याचे प्रदर्शन काही खास राहिले नाही. 2 ऑक्टोबरपासून वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी त्याची निवड झालेली नाही. मात्र मुंबई क्रिकेट संघाच्या निवड समितीने जाहीर केलेल्या 24 सदस्यीय यादीत त्याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यशस्वी जैस्वाल या रणजी यादीत नसला तरी तो वेस्ट इंडिज कसोटी मालिकेत खेळताना दिसेल.

सरफराज-मुशीरकडे सर्वांचे लक्ष

गेल्या हंगामात सरफराज खान आणि त्याचा धाकटा भाऊ मुशीर यांनी मुंबईसाठी तुफानी कामगिरी केली होती. 2023-24 रणजी स्पर्धेत मुंबईला विजेतेपद मिळवून देण्यात दोघांचाही मोठा वाटा होता. येणाऱ्या हंगामातही हे दोघे धडाकेबाज कामगिरी करण्यास सज्ज असतील. बीसीसीआयने गुरुवार, 25 सप्टेंबर रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला, मात्र त्यात सरफराज खानचे नाव नव्हते. मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी सांगितले की, सरफराज सध्या फिटनेस समस्येमुळे संघात निवडला गेला नाही.

2025-26 हंगामासाठी मुंबईचा संभाव्य रणजी संघ :

शार्दुल ठाकूर (कर्णधार), आयुष म्हात्रे, मुशीर खान, अंगकृष्ण रघुवंशी, अखिल हेरवाडकर, अजिंक्य रहाणे, सरफराज खान, सिद्धेश लाड, सुवेद पारकर, सूर्यांश शेडगे, आकाश पारकर, तुषार देशपांडे, सिल्वेस्टर डिसोझा, इरफान उमैर, रॉयस्टन डायस, प्रतीक मिश्रा, आकाश आनंद (यष्टीरक्षक), हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), प्रसाद पवार (यष्टीरक्षक), शम्स मुलानी, तनुष कोटियन, हिमांशू सिंग, अथर्व अंकोलेकर, इशान मुलचंदानी.

हे ही वाचा –

Hardik Pandya IND vs SL : इतकं सगळं रामायण घडत असताना हार्दिक पांड्या कुठे गायब होता, पहिल्याच ओव्हरनंतर संघाची साथ का सोडली? कोचने केला खुलासा

आणखी वाचा

Comments are closed.