14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी IPL कसा खेळला? AGM मध्ये BCCI ला प्रश्न, बदलला नियम


Vaibhav Suryavanshi IPL Rules : वैभव सूर्यवंशी… अवघ्या 14 वर्षांच्या बिहारच्या या पठ्ठ्यानं 2025 चा आयपीएल सीझन गाजवला. राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या वैभवनं फक्त सात सामने खेळले आणि 252 धावा फटकावल्या. त्यात एक शतक आणि एक अर्धशतक. त्यामुळे अवघ्या क्रिकेटविश्वाची नजर वळली ती या कोवळ्या मुलाकडे. पण रविवारी झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या संजय नाईक यांनी आयपीएलमधल्या खेळाडूंच्या वयोमर्यादेवरुन एक प्रश्न उपस्थित केला. त्यावरुन बराच वेळ चर्चा घडली.

‘14 वर्षांच्या खेळाडूला आयपीएलमध्ये एन्ट्री कशी?’

बीसीसीआयच्या सभेत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधी संजय नाईक यांनी आयपीएलमध्ये 14 वर्षांच्या खेळाडूंना खेळण्याची परवानगी देणाऱ्या नियमावर बोट ठेवत काही प्रश्न उपस्थित केले. संजय नाईक यांनी एमसीएकडून आयोजित केल्या जाणाऱ्या टी20 स्पर्धेतल्या नियमाचाही दाखला दिला. एमसीए आपल्या टी20 मुंबई लीगमध्ये 16 वर्षांखालील खेळाडूंना खेळण्यास परवानगी देत नाही. जरी एमसीएकडे युवा खेळाडूंची फौज असली तरीही या स्पर्धेसाठी वयोमर्यादा लागू करण्यात आली आहे. त्यांच्याकडे भरपूर तरुण खेळाडू उपलब्ध असले तरी. एमसीएच्या सध्याच्या धोरणानुसार 16 वर्षांखालील खेळाडूंना आयपीएलमधून वगळण्यात आले आहे आणि त्यांना फक्त सिनियल लेव्हल टी20 क्रिकेटपुरचं मर्यादित ठेवण्यात आलं आहे.

‘वैभव सूर्यवंशी आयपीएल खेळला कारण…’

दरम्यान नाईक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर आयपीएल सीईओ हेमांग अमीन यांनी स्पष्टिकरण दिलं. या चर्चेदरम्यान अमीन म्हणाले की, “वैभव सूर्यवंशीला आयपीएल खेळण्याची परवानगी देण्यात आली याचं कारण तो त्याआधी बिहारकडून प्रथमश्रेणी क्रिकेट खेळला होता. कोणत्याही वयोगटातील खेळाडू रणजी करंडक किंवा लिस्ट ए स्पर्धा खेळल्यानंतर आयपीएलसाठी पात्र ठरतो..’’

बीसीसीआयचा नवा नियम काय?

आयपीएलच्या नियमानुसार आता 16 वर्षांखालील 19 वर्षांखालील कोणताही खेळाडू आयपीएल ऑक्शनसाठी नाव दाखल करु शकतो. मात्र त्यासाठी त्या खेळाडूनं किमान एक प्रथम श्रेणी सामना (FIRST CLASS MATCH) किंवा लिस्ट ए (LIST A) सामना खेळणं बंधनकारक आहे. बीसीसीआयच्या या नियमामुळे भविष्यात 16 किंवा 19 वर्षांखालील अनेक युवा खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसतील.

आणखी वाचा

Comments are closed.