बी.कॉम पास निलेश घायवळने अख्ख्या पोलीस यंत्रणेला चुना लावला, ढीगभर गुन्हे असूनही पासपोर्ट कसा


पुणे: पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणी घायवळ (Ghaywal Gang) टोळीचा प्रमुख निलेश घायवळने (Nilesh Ghaywal) पासपोर्ट काढण्यासाठी चुकीचा पत्ता दिल्याचे तपासातून समोर आलं आहे. शासनाच्या अनेक यंत्रणांची फसवणूक करून निलेश घायवळ ने पासपोर्ट मिळवला असल्याची माहिती आता पोलिसांनी (Police) दिली आहे. पुण्यात (Pune) अनेक गुन्हे असल्यामुळे पासपोर्ट मिळाला नसता त्यामुळे थेट अहिल्यानगर मधील एका चुकीचा पत्ता दाखवत कागदपत्र देत पासपोर्ट मिळवला. अहिल्यानगर पोलिसांनी त्याचा येथील पत्त्यावर घायवळ “not available” असा शेरा दिल्यावर सुद्धा त्याला पासपोर्ट मिळालाच कसा असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. पुणे पोलिसांनी घायवळ विरोधात लुक आऊट नोटीस जारी केली असून पुढील तपास सुरू आहे. पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणी घायवळ विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.याबाबत पुण्याचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी माहिती दिली आहे.

Nilesh Ghaywal: सवणूक करून,बाबी लपवून तात्काळमध्ये पासपोर्ट मिळवला

आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार निलेश घायवळ याने तो पासपोर्ट 2021 मधील बाराव्या महिन्यामध्ये काढला आहे, त्यावरचा पत्ता आहे तो आपण व्हेरिफाय केला असता तो पत्ता बनावट आहे, असं प्रथमदर्शनी निष्पन्न झालं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्येच कोतवाली पोलीस स्थानकाच्या हद्दीमधील त्यांनी पत्ता दिला होता त्या ठिकाणी तो वास्तव्यास नव्हता. त्याला माहीत होतं हे सर्व बनावट आहे, तरीही त्याने शासनाची, पासपोर्ट विभागाची फसवणूक करून त्या सर्व गोष्टी त्याने लपवून तात्काळमध्ये पासपोर्ट मिळवला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सध्या पोलीस करत आहेत. हा पासपोर्ट त्याने कसा मिळवला या सर्व गोष्टींची चौकशी सुरू आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे.

Nilesh Ghaywal : कहाणी निलेश घायवळच्या पासपोर्टची

निलेश घायवळवर पुण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने पासपोर्ट मिळणार नाही हे ओळखून त्याने पासपोर्ट मिळवण्यासाठी अहिल्यानगरमधील खोटा पत्ता वापरायचं ठरवलं. त्याने २३ डिसेंबर २०१९ ला पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडे तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज केला‌. त्यासाठी त्याने नावात देखील बदल केला. निलेशने त्याच नाव घायवळ ऐवजी गायवळ असं अर्जावर नमुद केलं. म्हणजे Ghaywal या नावातील h काढून Gaywal असं केलं. त्याचबरोबर अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोटा पत्ता त्याने नमुद केला. त्याने गौरी घुमटानंदी बाजार, कोतवाली, माळीवाडा रोड ४१४००१ असा पत्ता दिला.

Nilesh Ghaywal : Not available एवढाच अभिप्राय पाठवला

पासपोर्ट कार्यालयाकडून घायवळचा अर्ज तपासणीसाठी कोतवाली पोलीसांकडे पाठवण्यात आला असता कोतवाली पोलीसांच्या मते त्यांनी घायवळने दिलेल्या पत्त्यावर जाऊन पाहणी केली. मात्र त्यांना निलेश घायवळ त्याठिकाणी रहात असल्याचे आढळून आले नाही. त्याचबरोबर निलेश घायवळ सोबत त्यांचा संपर्क देखील झाला नाही. मात्र आश्चर्य म्हणजे कोतवाली पोलीसांनी पासपोर्ट कार्यालयाला Not available एवढाच अभिप्राय पाठवला. त्याहुन आश्चर्य म्हणजे पासपोर्ट कार्यालयाने घायवळला तात्काळ पासपोर्टसाठीचे इतर निकष वापरुन १६ जानेवारी २०२० ला पासपोर्ट मंजुर केला आणि घायवळला पासपोर्ट मिळाला. त्यानंतर २०२१ मध्ये निलेश घायवळला पुण्यातील एका दरोड्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आणि मकोका कायद्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली. पुढच्यावर्षी म्हणजे २०२२ मध्ये घायवळला त्या गुन्ह्यात न्यायालयाकडून जामीन मिळाला. तो देताना न्यायालयाने घायवळला त्याचा पासपोर्ट पोलीसांकडे जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र घायवळ ने त्याचा पासपोर्ट जमा केला नाही आणि पोलीसांनी देखील जमा करुन घेतला नाही. हाच पासपोर्ट वापरुन सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर निलेश घायवळ तीन महिन्यांचा व्हिजा मिळवून युरोपला फिरायला गेला‌.

Nilesh Ghaywal: ९० दिवसांच्या व्हिसावर स्वित्झर्लंडला गेल्याचे समोर

पुणे पोलिसांना गुंगारा देऊन निलेश घायवळ 90 दिवसांच्या व्हिसावर स्वित्झर्लंडमध्ये फिरत असल्याची माहिती समोर आली आहे. कोथरूड भागात किरकोळ वादातून एका तरुणावर गोळीबाराच्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) ९० दिवसांच्या व्हिसावर स्वित्झर्लंडला गेल्याचे समोर आले आहे. अहिल्यानगरमधून त्याने ‘तत्काळ’ पासपोर्ट मिळविले आहे. या पासपोर्ट  प्रकरणाचा तपास पुणे पोलीस करीत आहेत. एवढे गुन्हे दाखल असताना पासपोर्ट, व्हिसा कसा मिळाला, याचा शोध पुणे पोलीस घेत आहे. घायवळ याला अटक करण्यासाठी पोलिसांनी ‘लूक आऊट’ नोटीस बजावली आहे.(Nilesh Ghaywal)

https://www.youtube.com/watch?v=2nzo1fl6ho4

आणखी वाचा

Comments are closed.