बाहेरुन पक्षात येणाऱ्यांची दादागिरी खपवून घेऊ नका, आपण सगळे वीरशैव लिंगायत; भाजप आमदाराचं वक्तव
सोलापूर बातम्या: अलीकडच्या काळात राजकारणातील नेत्यांचा गुन्हेगारांशी असलेला संबंध हा चिंतेचा विषय असताना सोलापूरमधील एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोलापूरमध्ये एका तडीपार गुंडाने (Tadipar Criminal) आयोजित केलेल्या कार्यक्रमाला भाजप आमदार विजयकुमार देशमुख (MLA Vijaykumar Deshmukh) यांनी उपस्थिती लावली होती. एवढेच नव्हे तर या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन त्यांनी भाजपच्याच (BJP) शहराध्यक्षाला सुनावले. शहर अध्यक्षांचे वागणे चुकीचे आहे, असे विजयकुमार देशमुख यांनी म्हटले. तसेच बाहेरील पक्षातून भाजपमध्ये येऊन कार्यकर्त्यांना दमदाटी करणाऱ्यांना कमरेत लाथ घाला, असा सल्लादेखील आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिला आहे. यामुळे भाजप पक्षातील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
सोलापूर आणि धाराशिवमधून तडीपार असलेल्या श्रीशैल हुळ्ळे याने आयोजित केलेल्या जनसंवाद बैठकीला आमदार विजयकुमार देशमुख यांनी हजेरी लावली होती. समाजाची बैठक का घेतली असं काही लोकं म्हणतात, जर असं कोणी दमदाटी करत असेल तर त्याच्या कमरेत लाथ घाला, त्यात कसलीही हयगय करू नका. कोणीतरी कुठल्या तरी पक्षातून इकडं आमच्याकडं चमचेगिरी करत यायचं, इथं येऊन दादागिरी करत असेल तर खपवून घेऊ नका, आपण सगळे वीरशैव लिंगायत आहोत, असे देशमुख यांनी म्हटले.
भाजप कार्यकर्त्यांनी समाजाची बैठक घेऊ नये असे जर भाजप शहराध्यक्ष यांना वाटत असेल तर ते चुकीचे आहे. मी स्वतः वीरशैव आहे, समाजाला एकत्रित करण्यासाठी मी एक काय दहा बैठक घेईन, समाजाचा विकास म्हणजे राष्ट्राचा विकास, असे विधान भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी जाहीर कार्यक्रमात केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे तडीपार करण्यात आल्यानंतर देखील शहरात फिरत असल्याने श्रीशैल हुळ्ळे विरोधात पोलिसांनी गुन्हा देखील नोंद केला आहे. त्यामुळे एका तडीपार गुंडाला पाठीशी घालत आमदार विजय देशमुख यांनी कार्यक्रमला उपस्थिती लावत केलेल्या विधानाची सध्या सोलापुरात जोरदर चर्चा रंगली आहे. मात्र, तडीपार गुंडासोबत व्यासपीठावर बसणाऱ्या आणि स्वत:च्याच पक्षावर दुगाण्या झाडणाऱ्या विजय देशमुख यांच्यावर भाजप नेतृत्त्वाकडून काही कारवाई केली जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
इतर बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.